Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभांरभ


बीड, (प्रतिनिधी) - भारताच्या संरक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या जवानांच्या कुटूंबियांच्या व निवृत्त सैनिकांच्या पूनर्वसनासाठी ध्वजदिन निधीतून कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यासाठी ध्वजदिन निधीस नागरिकांनी तसेच समाजिक संस्थांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. बीड येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह बोलत होते. 

या कार्यक्रमास कर्नल सतिश हंगे, कर्नल डोरले, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरास्त, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर खिरडकर, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) भगवान सोनवणे, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) राजेश गायकवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. ध्वजदिन निधीचे महत्व विशद करतांना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह पुढे म्हणाले की, समाजातील सर्व घटकांनी सैन्य आणि सैनिकांच्या व त्यांच्या कुटूंबियांप्रती उदात्त भावना व्यक्त करण्याची संधी म्हणून ध्वजदिन निधीकडे पाहिले पाहिजे. या माध्यमातून आपण आपल्या देशाच्या संरक्षणासाठी त्याग व बलिदान देणार्‍या सैनिकांचा सन्मान करुन शकतो. अशा सैनिकांच्या मदतीसाठी सर्व शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांनी प्राधान्याने पुढे आले पाहिजे असे सांगून प्रत्येक नागरिकांनी आपल्या पाल्यांमध्ये सैनिका सारखे शिस्त व मान सन्मानाची भावना निर्माण केली पाहिजे. हीच भावना महिलाप्रती असली पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. ध्वजदिन निधी संकलनाचे मागील वर्षाचे उद्दीष्ट पूर्ण झाले असून चालु वर्षाचे दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्तीचा ध्वजदिन निधी संकलीत करुन इतर जिल्हयापेक्षा यामध्ये उत्कृष्ट काम करेल. तसेच चालु वर्षाचे उद्दीष्ट लवकर पूर्ण होईल यासाठी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाने नियोजन करण्यात आले आहे.