शेतकर्‍यांनो, आपली जनावरे मंत्र्यांकडे पाठवा!


अहमदनगरः राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कुकडीचे पाणी त्यांच्या भागातून आणून भरपूर चार्‍याचे पीक घेतले आहे. ते ही आपले पाहुणेच आहेत. अडीअडणीच्या काळात पाहुणेच आपल्या कामी येतात नाही का? आता त्यांनीच चारा नसेल, तर जनावरे पाहुण्यांकडे धाडा, असा सल्ला दिला आहे. मंत्र्यांचे म्हणणे आपण गांभीर्याने घ्यायला नको का? शेतकर्‍यांनो आपली जनावरे मंत्र्यांच्या दारात आणून बांधा. चार्‍याचा प्रश्‍न आपोआप सुटेल. 

महाराष्ट्रात या वर्षी फारच कमी पाऊस झाला आहे. प्रा. शिंदे यांच्या मतदारसंघातील काही महसूल मंडळात तर तीस ते 45 टक्क्यांच्या आत पाऊस आहे. कोल्हापूर, सांगली, सातार्‍याचा काही भाग, कोकण आणि अकोला वगळता उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाचे संकट गंभीर आहे. महाराष्ट्रात उसाखालचे क्षेत्र जास्त असले, तरी ऊसही पाण्याअभावी जळून गेला आहे. शिवाय केवळ उसाचा चारा म्हणून वापर करून भागत नाही. जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य नसते. जेव्हा दुष्काळ असतो, तेव्हा सरकारने मदतीला यायचे असते. लातूरला पाण्याची टंचाई निर्माण झाली, तेव्हा मिरजेतून रेल्वेने पाणी पुरवण्यात आले. आताही काही शेतकर्‍यांनी चारा नसल्याने थेट कोकणातून चारा आणायला सुरुवात केली आहे. संगमनेर भागात असा चारा आणून त्याची साठवण करायला सुरुवात केली आहे. नवा चारा तयार व्हायला किमान ऑगस्ट तरी उजाडेल. तोपर्यंत चार्‍याची व्यवस्था करायला हवी. असे असताना सरकारमधील मंत्र्यांना त्याचे गांभीर्य आहे, असे दिसत नाही. एकटा-दुकटा शेतकरी चारा आणू शकत नाही. जवळपास कुठे चारा असेल, तर शेतकरी चारा विकत घेऊन जनावरे जगविण्याचा प्रयत्न करील. त्यातही मोठे शेतकरीच त्यातून तगू शकतील. 

यापूर्वी जेव्हा जेव्हा केव्हा दुष्काळ पडले, तेव्हा सरकार शेतकर्‍यांच्या मागे उभे राहिले. चारातगाई दिली जायची. जनावरांच्या छावण्या काढल्या जायच्या. चारा डेपो सुरू केले जायचे. पांजरापोळ ही एक प्रकारची छावणीच असते. गोवंश हत्या होऊ नयेत, म्हणून पांजरापोळ सुरू करण्याचे दिलेले आश्‍वासन भाजपच्या मंत्र्यांना पूर्ण करता आले नाही. चारा डेपोत गैरव्यवहार होतात, छावण्यात गैरव्यवहार होतात, म्हणून ते सुरूच करायचे नाही, असे मंत्री म्हणत आहेत. वास्तविक गैरव्यवहार रोखणारी यंत्रणा निर्माण करण्याऐवजी छावण्या व चाराडेपो सुरू करणार नाही, थेट पैसे देऊ असे सरकार म्हणत असेल, तर त्यातून मार्ग निघणार नाही. त्याचे कारण चारा फार दूरवरून आणावा लागणार आहे. शेतकर्‍यांना ते शक्य नाही. संरक्षण खरेदीत गैरव्यवहार होतो, म्हणून संरक्षण साहित्य खरेदी टाळण्याचा जो प्रकार ए. के. अँटनी यांच्या काळात झाला, तसा प्रकार आता राज्यातले भाजपचे सरकार करीत आहे. त्यातून जनावरे कशी जगवायची, हा गंभीर प्रश्‍न आहे. 
शेतकर्‍यांच्या दावणीला चारा देण्याऐववजी सरकारमधील मंत्री शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर अजब उत्तर देत असतील, तर हा सत्तेचा उन्माद आहे, असेच म्हणावे लागेल. 

जनावरांची चार्‍याअभावी उपासमार होत असल्याचे शेतकरी मंत्र्यांना सांगत असतील, तर त्यातून काय मार्ग काढणार, हे सांगून त्याचे समाधान करण्याची जबाबदारी प्रा. शिंदे यांच्यासारख्या मंत्र्यांची होती. चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला शिंदे यांनी शेतकर्‍याला दिल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांमधून शिंदे यांच्याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनीही प्रा. शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून सरकारची जबाबदारी झटकण्याची ही भाषा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर प्रा. शिंदे हे पाथर्डी येथे आले होते. त्या वेळी एक शेतकरी शिंदे यांना भेटायला आला व दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांची चार्‍याअभावी उपासमार होत असल्याचे शेतकरी मंत्री शिंदे यांना सांगत होता. यावर त्या शेतकर्‍याचे समाधान करण्याची जबाबदारी शिंदे यांची होती; परंतु त्यांनी त्या शेतकर्‍याला वेगळेच उत्तर दिले. चारा नसेल तर आपली जनावरे पाहुण्याकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला त्यांनी दिला. रघुनाथदादांनी अशी उत्तरे देणार्‍यांना मंत्री म्हणावं की नाही हा प्रश्‍न पडतो. आमचे पाहुणे जम्मू-काश्मीर किंवा तामिळनाडूला राहत नाहीत. तेही या दुष्काळी भागातच राहतात, असं निदर्शनास आणलं. सर्वत्र दुष्काळ असताना पाहुण्यारावळ्यांकडे तरी चारा कुठून असणार, हे मंत्र्यांना कळायला हवे होते. आता शेतकर्‍यांनी आपली जनावरे चार्‍याअभावी सोडून न देता मंत्री प्रा. शिंदे हे आपलेच पाहुणे आहेत, असे समजून त्यांच्या घरी आणून सोडावीत, म्हणजे आपल्या बोलण्याचा अर्थ त्यांना कळू शकेल. नाहीतरी प्रा. शिंदे आपले पाहुणेच आहेत. 

भागा वरखडे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget