केंद्रीय पथकाकडून सातारा जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणीसातारा, (प्रतिनिधीा) : सातारा जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील काही गावात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक आज जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने जिल्ह्यातील माण तालुक्यातील शेणवाडी, महाबळेश्‍वरवाडी आणि विराळी या गावातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीचा अहवाल हे केंद्रीय पथक केंद्रशासनाकडे सादर करणार असल्याचे विभागीय आयुक्त दीपकर म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.


केंद्रीय विभागाचे सहसंचालक एफसीडी (एक्सपेंडीचर) सुभाषचंद्र मीना यांच्या नेतृत्वाखाली हा दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक दशरथ तांबोळी, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी सुनिल बोरकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, माणच्या तहसीलदार बी. एस. माने यांचा या पथकात समावेश होता.


आज सांगली जिल्ह्यातील आटपाडीतून हे केंद्रीय पथक माण तालुक्यात दाखल झाले. माणमधील शेनवडी गावातील आळेवस्तीवर हणमंत हरी खिलारी यांच्या शेतात जावून पथकाने पाहणी केली, त्यावेळी पथकाने गेल्यावर्षी किती उत्पन्न झाले होते याची माहिती विचारली असता खिलारी यांनी गेल्या वर्षी 6 क्विंटल बाजरी झाली होती मात्र यावर्षी पाऊस झाला नसल्यामुळे 0.60 हेक्टरवर केवळ 40 किलो बाजरी झाली आहे. त्या बाजरीचे केवळ 800 रुपये मिळाले आहेत. या वर्षी पेरलेली ज्वारी मागच्या हंगामी पावसामुळे हिरवी दिसत असली तरी त्याला दाणे धरणार नाही, त्यामुळे त्यातून कसलेही उत्पन्न मिळणार नसल्याचे सांगून या ज्वारीच्या पेरणीसाठी 4,500 रुपये खर्च आला असल्याचे त्यांनी सांगितले. पथकाने पुढे महाबळेश्‍वरवाडी येथील तलावाला भेट दिली. चार गावाला पाणी पुरवठा करणारा हा तलाव पावसाअभावी कोरडा असून महाबळेश्‍वरवाडीला रोज सोळा हजार लीटर एवढे पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जाते, असे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले.


विरळी गावाच्या शिवारातील धर्मू राणू लाडे यांच्या 0.40 हेक्टरवर असलेली डाळींब बागेची पथकाने पाहणी केली. गेल्यावर्षी या डाळींबाचे उत्पादन 1 लाख 10 हजाराचे झाले होते. यावर्षी मात्र जुलै मध्ये छाटणी केलेल्या या बागेतून काहीच उत्पादन मिळाले नसून आता बाग वाळत आहे ती वाचविण्यासाठी आता त्या बागेला पाण्याची गरज असल्याचे लाडे यांनी पथकाला सांगितले.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर यांनी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची, चा-याची आणि पिकाची परिस्थिती याची माहिती विशद केली. माण तालुक्याचा दौरा आटोपून पथक पुणे जिल्ह्याकडे रवाना झाले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget