राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सेनादल चॅम्पियन

नगर । प्रतिनिधी -
हरयाणामध्ये झालेल्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सेनादलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. दोन सुवर्ण व दोन कांस्यपदके मिळविणार्‍या 10 सायकलपटूंच्या या संघाचा सराव नगर येथे झाला. संघाचे प्रमुख प्रशिक्षक सुभेदार सुमेरसिंग नगर येथे आर्मर्ड कोअरमध्ये कार्यरत आहेत.
हरयाणा सायकलिंग असोसिएशनने कुरुक्षेत्र येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. सेनादलाच्या संघाने टीम टाईम ट्रायल या 60 किलोमीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून जोरदार सलामी दिली. मनजितसिंग, पी. आर. बिष्णोई, अतुलकुमार व सतबीरसिंग यांनी ही कामगिरी केली.

सेनादलाने दुसरे सुवर्णपदक 120 किलोमीटर अंतराच्या मास स्टार्ट शर्यतीत जिंकले. यात संघाचे सहा सायकलपटू सहभागी झाले होते. मनजितसिंगने जोरदार मुसंडी मारत सुवर्ण पटकाविले. त्याचा सहकारी विष्णू नाईकवाडी याने कांस्यपदक जिंकले. अचानक पडल्यामुळे सतबीरसिंगचे पदक थोडक्यात चुकले. त्यामुळे या शर्यतीत तिन्ही पदके जिंकण्याचा सेनादल संघाचा विक्रम हुकला. संघाकडून अतुलकुमार, दिनेश व बिष्णोई हे खेळाडूही शर्यतीत उतरले होते.

इंडिव्हिज्युअल टाइम ट्रायल या 40 किलोमीटरच्या शर्यतीत सेनादलाकडून दोन सायकलपटू उतरले होते. अतुलकुमारने त्यात कांस्यपदक जिंकले. सायकल पंक्चर झाल्यामुळे मनजितसिंग पदक मिळण्यापासून वंचित राहिला. गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर राहिल्याने सेनादलाच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.


एकूण 10 सायकलपटूंचा समावेश असलेल्या या संघाचे व्यवस्थापक लष्कराचे क्रीडा अधिकारी कर्नल परमिंदर सिंग होते. मुख्य प्रशिक्षक सुमेरसिंग, प्रशिक्षक नायब सुभेदार एच. आर. गोदारा, धर्मेंद्र व करमजित दहिया यांनी प्रशिक्षणाची सर्व जबाबदारी संभाळली. नगरच्या आर्मर्ड कोअरचे कमांडिंग ऑफिसर जनरल नीरज कपूर यांनी खेळाडू व अधिकारी यांचे कौतुक केले.

राष्ट्रीय स्पर्धेत ठसा उमटविणार्‍या सेनादलाच्या संघाचा सराव दीर्घकाळ नगर येथेच सुरू होता. स्पर्धेआधी या संघाचे पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या संकुलात विशेष शिबीर झाले. त्यानंतर कुरुक्षेत्र येथेही स्पर्धेपूर्वी 15 दिवस संघाचा कसून सराव झाला, असे मुख्य प्रशिक्षक सुमेरसिंग यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget