Breaking News

विद्यार्थ्यांना वैज्ञानिकदृष्ट्या सृजनशील बनवावे : आ. गोरे


दहिवडी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना वैज्ञानिकदृष्टया सृजनशील बनविण्यासह त्यांच्यात जिज्ञासावृत्ती वाढविण्यासाठी विज्ञान शिक्षकांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे.

विरळी (ता. माण) येथे आयोजित तालुकास्तरीय 44 व्या विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हरिभाऊ जगदाळे, विरळी शैक्षणिक केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. गंबरे, सरपंच प्रशांत गोरड, उपसरपंच हेमंत नलवडे, विज्ञान शिक्षक पी. डी. काशीद, मुख्याध्यापक श्री. माने, बबन काळेल, दत्तात्रय नलवडे, उत्तम नलवडे, प्रा. बंडगर, प्रा. सावंत, विनोद काळेल, केरप्पा काळेल, दत्तात्रय घुटूकडे, अभिजीत काळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.माण तालुक्यात पाण्याचा दुष्काळ असला तरी येथे बुद्धीमतेचा सुकाळ आहे. भविष्यात या सुजाण, गुणवंत विद्यार्थ्यांमधून चांगले शास्त्रज्ञ, संशोधक निर्माण होतील. आज तालुक्यांच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी एवढी चांगली वैज्ञानिक उपकरणे तयार केली आहेत. त्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून मळणी यंत्र, मोटार सायकल, फवारणी यंत्र, तसेच सेंद्रिय शेती अशा विविध क्षेत्रांचा सहभाग असलेली उपकरणे नोंदवण्यात आल्याचे समाधान वाटते, असेही ते म्हणाले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता तपासण्यासाठी प्रश्‍नमंजुषा व निबंध स्पर्धेचेही आजोजन करण्यात आले होते. त्यासही विद्यार्थ्यांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला.या प्रदर्शनात जिल्हा परिषद शाळा वळईचे ‘कॅन्सरमुक्त शेती’ हे वैज्ञानिक उपकरण विशेष लक्षणिय ठरले. ग्रामीण जनजीवनावर आधारित गवताचे घर, गोबर गॅस, आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड, शेतीस पूरकव्यवसाय यांच्या प्रतिकृतीही या प्रदर्शनात सादर करण्यात आल्या होत्या. रासायनिक खतांच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व उपायजोजना यांचे महत्वही विविध उपकरणांच्या माध्यमातूत विद्यार्थी व शिक्षकांनी या वेळी पटवून दिले.