Breaking News

सातारा जिल्ह्यात महामानवास अभिवादन महापरिनिर्वाणदिनानिमित्त सातारा शहरात आमणे बंगला ते भीमाई स्मारकापर्यंत कँडल मार्चसातारा, (प्रतिनिधी) : दलितोद्धारक, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी जिल्ह्यातील असंख्य संघटना व दलित बांधवांनी विनम्र अभिवादन करत आदरांजली वाहिली.  

सातारा नगरपालिकेसमोर असलेल्या यशवंत उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आल्या. पहाटेपासून मंगल सूरांनी येथील संपूर्ण वातावरणच भीममय झाले होते. सकाळी दहा वाजता बुद्धवंदना घेण्यात आली. त्यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेकांनी पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासह आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सदस्यांनी येथील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.


दरम्यान, सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सातार्‍यातील तत्कालिन निवासस्थान असलेल्या आमणे बंगल्यापासून बाबासाहेबांच्या मातोश्री भीमाई यांच्या जरंडेश्‍वर नाका परिसरात असलेल्या स्मारकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. या कँडलमार्चमध्ये समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींचा मोठा सहभाग होता.
याशिवाय सातारा शहरातील प्रतापसिंहनगर, इंदिरानगर, गेंडामाळ झोपडपट्टी परिसरातील बुद्धविहार व समाजमंदिरांमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमा व अर्धपुतळ्याला अभिवादन केले. दरम्यान, नगरपालिकेसमोरील यशवंत उद्यानात उभारलेल्या डॉ. आंबेडकर यांच्यावरील पुस्तकांच्या स्टॉलवरही गर्दी होती.
वाठार स्टेशन येथेही अभिवादन
वाठार स्टेशन : येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेना शाखेतर्फे डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी शिवसेना उत्तर कोरेगाव तालुका प्रमुख संतोष सोळसकर, माजी सरपंच अमोल आवळे, तालुका उपप्रमुख प्रशांत निकम, संजय गांधी, अविनाश फडतरे, जिल्हा उपाध्यक्ष बाबूराव ढाणे, विभागप्रमुख विपुल चव्हाण, प्रशांत तावरे, पिंपोडे शाखाप्रमुख श्रीकांत निकम, उत्तमराव नलावडे, शामराव चव्हाण, वसंत धुमाळ, शिवसैनिक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.