Breaking News

भाजपाचा सपशेल पाडाव होईल : खा. शेट्टीफलटण (प्रतिनिधी) : सध्या पाच राज्यांच्या निवडणूका सुरू असून त्यात भाजपाचा सपशेल पाड़ाव होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप वगळून इतर सर्व पक्षांची महाआघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

येथील शासकीय विश्रामगृहावर आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, रवींद्र घाडगे आदी पदाधिकार्‍यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. 

भाजपा सरकारने सर्वच बाबतीत जनतेचा अपेक्षाभंग केला असून विकासाच्या बाबतीत देश मागे पडला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत असून राज्य सरकारने लिटरमागे पाच रुपये अनुदान देण्याबाबतही चालढकल चालविली आहे. खाजगी दूध संघ शेतकर्‍यांना अनुदान वगळून पैसे देत आहेत. अनुदानाचा चेंडू सरकारकडे असून शेतकर्‍यांच्या भावनांशी त्यांनी खेळू नये. अनुदानाचा निर्णय झाल्याने त्याप्रमाणेच त्यांनीही कार्यवाही करावी, त्यासाठी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना संपर्क करून प्रत्येकी पाच रुपये अनुदान त्वरित आणि वेळोवेळी देण्याची मागणी केल्याचेही खा. शेट्टी यांनी या वेळी सांगितले. 

सध्या विधानसभा निवडणुका लागलेल्या पाचपैकी तीन राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे. तेथील सरकारचा जनतेने चांगलाच अनुभव घेतला आहे. त्यामुळे जनता आता परिवर्तनाच्या शोधात आहेत. तेलंगानात भाजपचे अस्तित्वच नाही. मिझोराममध्येही साधारण तीच स्थिती आहे. इतर तीन राज्यांत काँग्रेसने भाजपापुढे चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे तेथे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सहज आघाडी घेत सत्ता मिळवेल, असा अंदाजही खासदार शेट्टी यांनी व्यक्त केला. 
 
साखरवाडीच्या न्यू फलटण शुगर वर्क्स या बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या थकित बिलासंदर्भात बोलताना त्यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याशी आपण चर्चा केली असून कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करून मागील हंगामात ऊस दिलेल्या उस उत्पादकांना त्यांचे पैसे प्राधान्याने देण्याची आपण मागणी केली आहे. प्रत्यक्ष लिलावातून किती पैसे येतील हे आता सांगता येत नसले तरी पहिले प्राधान्य शेतकर्‍यांचे पैसे देण्यास प्राधान्य राहील आपण बारकाईने कारखान्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचेेही शेट्टी यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपा वगळता इतर सर्व पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जो शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवेल त्यांना हमी भाव देईल, त्यांचे कर्ज माफ करेल अशा पक्षांबरोबर आम्ही राहणार आहोत सर्वांचा एकत्र राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी खा. शरद पवार यांच्याशीही चर्चा झाल्याचे या वेळी शेट्टी यांनी सांगितले.