सोलापूर येथे वडार समाजाचा राज्यव्यापी मेळावा


सातारा (प्रतिनिधी) : वडार समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण मिळावे, उपजिवीकेसाठी खोरे-पाटी व गाढवावरुन वाळू वाहतूक करण्यास विनाअट परवानगी मिळावी तसेच समाजाच्या उन्नतीसाठी वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी या मागण्यासह इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. 17 रोजी सोलापूर येथे सकाळी 11 वाजता राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल पिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक माहिती देताना पिसाळ म्हणाले, या मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यातून 25 हजार समाजबांधव जाणार आहेत. शासनाने आजपर्यंत आमच्यावर मोठा अन्याय केला आहे. जातीच्या दाखल्यासाठी 1961 पूर्वीचा पुरावा मागितला जात आहे. आमची जमात ही भटकी व निरक्षर असल्याने आमच्या कुठेही नोंद नाही. त्यामुळे आम्हाला असे दाखले मिळत नाही ही अट शिथील करण्यात यावी. आमचा पारंपरिक व्यवसाय असलेला खाणीचा व्यवसायही धनदांडग्यांनी बळकावला आहे. रॉयल्टी आणि दंडाची रक्कम मोठी असल्याने आमचा गरीब समाज ती भरु शकत नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्नाटक, प. बंगाल, आंध्रप्रदेश येथे वडार समाजा हा एससी एसटी वर्गात मोडत आहे. मात्र, आपल्या महाराष्ट्रातच आम्हाला आरक्षण मिळत नाही ही शोकांतिका आहे. मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पर्यावरण मंत्री रामदास कदम, एकनाथ शिंदे, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कर्नाटकचे माजी मंत्री अरविंदजी लिंबावळी, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणितीताई शिंदे, कार्याध्यक्ष रवीजी माकले, सोलापूर महापौर शोभाताई बनहट्टी, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे हे उपस्थित राहणार असल्याचे पिसाळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी बाळासाहेब पवार, दत्तात्रय पवार, राजू फडतरे, रमेश वीटकर, अशोक पवार, नाना जाधव, सुर्यकांत पवार, एकनाथ माने, युवराज नलावडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget