Breaking News

सातार्‍यात एटीएम फोडणारे चोरटे पिकअपमधून आल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीस


सातारा, (प्रतिनिधी) : सातारा शहरालगत बारावकरनगर व संभाजीनगर परिसरात दोन एटीएम सेंटर फोडून 20 लाख रुपयांची रोकड लांबवणारे दरोडेखोर पिकअप गाडीतून आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरोडेखोरांची संख्या सहा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, अंधारामुळे त्यातून स्पष्टता दिसण्यात अडथळे आले आहेत.

मंगळवारी पहाटे दरोडेखोरांनी सातारा शहर परिसरातील एसबीआयची दोन एटीएम सेंटर फोडल्यानंतर त्यात एकामध्ये 20 लाख रुपयांचे घबाड त्यांच्या हाती लागले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तपासाचे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. मंगळवारी व बुधवारी दिवसभरात पोलिसांचे एक पथक चोरीचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र सद्यस्थितीला पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे सापडले नाहीत.

यासंबंधी पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. हे सीसीटीव्ही अतिशय अंधुक असून त्यातून चोरट्यांची संख्या समजण्यास मदत होत आहे. याशिवाय दरोडेखोरांच्या हालचाली लांबून दिसत आहेत. चोरटे पिकअपमधून आले असल्याचे दिसत आहे. मात्र त्यावरील क्रमांक स्पष्टपणे दिसत नाही. या सीसीटीव्हीशिवाय आणखी इतर सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असून तांत्रिक पध्दतीनेही पोलिस तपास करत आहेत.