Breaking News

सहकार क्षेत्रातील नगरच्या कामाची श्रीमंती खूप मोठीनगर । प्रतिनिधी -
नगर जिल्हा सहकारात अग्रेसर आहे. सहकार क्षेत्रात नगरच्या कामाची श्रीमंती खूप मोठी असून सहकारातून नगरचे ‘ब्रँडींग’ देशाला दाखवायचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
सहकार मंत्री देशमुख यांनी सोमवारी (दि.3) अहमदनगर शहर सहकारी बँकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा व व्हा.चेअरमन सुजित बेडेकर यांनी बँकेचा वार्षिक अहवाल ना. देशमुख यांना देऊन बँकेची सविस्तर माहिती दिली. 
ना. देशमुख म्हणाले की, राज्य सरकारने सहकारी संस्था बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. आपल्याला सर्वांना मिळून सहकारातून महाराष्ट्र समृध्द करायचा असून महाराष्ट्र समृध्द करण्याची ताकद सहकारात आहे. सहकाराने अनेकांना रोजगार, नोकर्‍या दिल्या आहेत. नगर जिल्हा सहकारात अग्रेसर आहे. प्रत्येकाने आपल्या तालुका आणि गावाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट समाजासमोर, राज्यासमोर ठेवावी. सहकार घराघरात पोहचवून जनतेच्या कल्याणाचे काम करावे, असेही ते म्हणाले.  सध्या भीषण दुष्काळाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळावर शासन काम करत आहे. परंतु सहकार क्षेत्रानेही दुष्काळास मदत करून आपले योगदान द्यावे असे आवाहन करून शहर सहकारी बँकेची 45 वर्षांची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ना. देशमुख यांनी काढले. 

प्रास्ताविकात सुभाष गुंदेचा यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की, कर्मचारी, कामगार, सामान्य लोकांसाठी 1971 मध्ये शहर सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली. आज 600 कोटींच्या ठेवी बँकेकडे असून बँकेने कर्जरुपाने अनेकांना रोजगार देऊन व्यावसायिक, उद्योजक बनविले आहे. सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासावर बँकेने शिखर गाठले आहे. आधुनिक युगात काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खातेदार, सभासदांना बँक सेवा सुविधा देत आहे. 
यावेळी बँकेचे संचालक गिरीश घैसास, मच्छिंद्र क्षेत्रे, सुनील फळे, संजय घुले, अशोक कानडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, सदा देवगावकर, वसंत लोढा, दादाभाऊ चितळकर, अल्लाउद्दीन मिर्झा, बँकेचे सीईओ संतोष अनासपुरे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.