Breaking News

सातार्‍यात ‘चाय’वाल्यांची क्रेझ वाढतेयं


सातारा (प्रतिनिधी)-अगदी काही वर्षापूर्वी ‘अमृततुल्य’ हे समर्पक नाव असलेल्या चहा नावाच्या पेयाने जनसमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पाहुणचारात मानाचे पान पटकावणारा चहा कधी चौकाच्या टपरीवर आला हे कळालेच नाही. 

सातार्‍यात एकेकाळी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असलेली खास चहाची हॉटेल आता जुनी झाली असली तरी त्यांनी आपल्या नावाचा दबदबा आजही कायम राखला आहे. असे असले तरी अगदी वर्षभराच्या कालावधीत सातार्‍यात वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेले आणि वेगळ्या नावाच्या अनेक चहांनी आपला वेगळा ‘चा’हता वर्ग निर्माण केला आहे, यावरुन सातार्‍यात ‘चाय’वाल्यांची क्रेझ वाढतेयं असे म्हटल्यास ती अतिशोयक्ती ठरणार नाही. 15 डिसेंबर जागतिक चहा दिनानिमित्त सातार्‍यातील चहा विक्रेत्यांचा घेतलेला हा खास आढावा...चहा हे सर्वत्र मिळणारे पेय असले तरी काही ठिकाणी मिळणारा चहा आपली वेगळी ओळख निर्माण करतो आणि नेमके हेच काम गेली अनेक वर्षे सातार्‍यातील अनेक स्पेशल चहावाल्यांनी केले आहे. सातार्‍याचे सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेल्या मोती चौकातील ‘श्रीराम’ चहाने सातारकरांना खर्‍या अर्थाने स्पेशल आणि वेगळ्या चवीच्या चहाची सवय लावली. श्रीरामपासून नजीकच असलेल्या सापतेंच्या ‘मिलन’ टी हाऊसने आपली ओळख आजपर्यंत टिकवून ठेवली आहे. याच मोतीचौकात राजपथावर आणखी एक अमृततुल्य चहाचे ठिकाण आहे. पितळेच्या किटलीत तयार केलेला चहा हे येथील वैशिष्ट्य. 

प्रभात टॉकीजसमोरील ‘चंद्रविलास’ ने आपले ठिकाण मोतीचौकानजीक आणले असले तरी त्यांच्या चहाची चव आहे तीच आहे. हॉटेलमधील मिठाई इतकेच मादर्व असलेल्या भाषेत गिर्‍हाईकाशी संवाद साधणारे वसंतशेठ जोशी हे ‘चंद्रविलास’चे मालकही येथील चहाइतकेच प्रसिद्ध आहेत. मोतीचौकातून थेट शहराचे नाक असलेल्या पोवईनाक्यावरील भारत भुवन आणि रतन टी हाऊसनेही आपल्या साऊथ इंडियन डिशबरोबर चहाची वेगळी चव जपली आहे. विशेषत: रतन टी हाऊसचा ‘गोल्डन’ चहा पिण्यासाठी अनेकजण येथे पायधुळ झाडतात. 
अलिकडच्या काळात बसस्थानक परिसरात चंदू चहावाल्याने आपला वेगळा ग्राहकवर्ग निर्माण केला आहे. पहाटेपासून सुरु असलेला चहाचा रतीब सायंकाळी उशीरापर्यंत सुरु असतो. चंदू चहावाल्यांची दुसरी शाखा पोवईनाक्यावरील शिक्षक बँकेसमोरही आहे. याठिकाणीही परिसरातील अनेकजण चहा पिण्यासाठी हजेरी लावतात. एकाच नावाने प्रसिद्ध असलेला पदार्थ सहसा दुसर्‍या कोणी विकला तर त्याला तेवढीच प्रसिद्धी मिळेल याची काहीही खात्री नसते (अपवाद वडापाव) मात्र, बसस्थानकापासून नजीकच्या परिसरात जोशी यांच्या पेट्रोलपंपासमोर ‘चंदू चहावाला’ याच नावाने आणखी एका चहावाल्याने आपले वेगळ्या चवीने आणि वेगळ्या हेअर स्टाईलने गिर्‍हाईकांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे आपल्या वेगळ्या चवीच्या चहाचा मसालाही त्याने विक्रीस ठेवला आहे.

या पारंपरिक चहापेक्षा वेगळ्या पद्धतीने चहा तयार करुन वेगळ्या पद्धतीच्या मातीच्या भांड्यात सर्व्ह होणारा कुल्हड चहाची सध्या सातार्‍यात मोठी क्रेझ आहे. आरटीओ कार्यालयाच्या संरक्षक भिंतीकडेला काही महिन्यापूर्वी सुरु झालेल्या या कुल्हड चहानेही सातारकरांना प्रथमच वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळ्या मातीच्या भांड्यात चहा मिळण्याची सोय केली आहे. याठिकाणीही दर्दी ‘चाय’वाल्याची मोठी गर्दी असते. 
राजपथावरील शाही मशिदीसमोर आता ‘इराणी’ चहाने वेगळ्या चवीचा आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या चहाचा नजराणा सातारकरांसाठी पेश केला आहे. या स्पेशल चहाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. अक्षय आनंद टोणे या तरुणाने खास हैद्राबाद येथे राहून हा चहा तयार करण्याची कृती आत्मसात केली आहे. या चहासोबतच बहुतेक ठिकाणी ग्रीन टी, लेमन टी मिळतो. प्रकृतीबाबत सजग झालेल्या नागरिकांनी या चहांना चांगली पसंती दिली आहे. पाच-दहा वर्षापूर्वी केवळ चहा असे नामानिधान असलेला चहा आता वेगवेगळ्या नावांनीच नव्हेतर वेगवेगळ्या चवीने सातारकरांमध्ये आपली क्रेझ वाढवतोयं हे मात्र नक्की.