Breaking News

विद्यार्थ्यांसाठीची मोफत बस प्रवास योजनेची अंमलबजावणी व्हावी; श्‍वेताताई महाले पाटील यांची ना. रावते यांच्याकडे मागणी


चिखली,(प्रतिनिधी): अत्यल्प पर्जन्यमानामुळे चिखली व बुलडाणा तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पासेसची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. मात्र, एस. टी. महामंडळाच्या बर्याच ही योजना राबवली जात नाही. तरी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या प्रत्येक तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले पाटील यांनी केली आहे.


परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना या संदर्भात 22 डिसेंबर रोजी मुंबई येथे निवेदन सादर केले आहे. राज्य परिवहन मंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या चिखली व बुलडाणा तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवास योजना सुरू केली आहे. या माध्यमातून शासनाने शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सन 2018 - 19 च्या उर्वरित शैक्षणिक सत्राकरीता शिक्षणासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयानुसार शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 15 नोव्हेंबर 2018 ते 15 एप्रिल 2019 पर्यंत पूर्णपणे मोफत बस प्रवास करता येईल. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या काही आगारांमध्ये सदर योजना राबवली जात नसल्याचे श्‍वेताताई महाले पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. परिणामी आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या पाल्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ही बाब लक्षात घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या विषयात जातीने लक्ष घालावे अशी अपेक्षा श्रीमती महाले यांनी व्यक्त केली आहे. सदर योजनेची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या चिखली व बुलडाणा तालुक्यात व्हावी आणि तेथील विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास योजनेच्या पासेस त्वरीत देण्यात याव्या अशी मागणी श्‍वेताताई महाले पाटील यांनी या निवेदनातून केली आहे.