Breaking News

उरमोडीचे पाणी राणंद तलावात सोडा : शिंदे


बिजवडी, (प्रतिनिधी) : माण तालुक्याक्याच्या उत्तर भागातील राणंद, (ता. माण) हा भाग वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचीत आहे. या परिसराचा कोणत्याच सिंचन योजनेत समावेश नसल्याने येथे कधी पाणी येईल, याची खात्री नाही. राणंद या गावापासून 9 कि. मी. अंतरावर गोंदवले खुर्द हे गाव असून येथील माण नदीच्या बंधार्‍यात उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी बंदीस्त पाईपलाईनद्वारे राणंद व परिसरातील गावांना मिळू शकते.

 त्यासाठी प्रशासनाने टंचाई निवारण योजनेमधून या गावांना उरमोडीचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे. राणंद ता. माण व परिसरातील गावे उत्तर माणच्या भागात येतात.

 तर उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माण तालुक्याच्या दक्षिण भागात आले आहे. मात्र, राणंद हे गाव उत्तर माण व दक्षिण माणच्या मध्यावर असून या भागाला उरमोडीचे पाणी जवळ आहे. जिहे कटापूरचे पाणी या भागाला कधी मिळेल हे सांगता येत नसल्याने जवळ आलेले उरमोडीचे पाणी राणंद तलावात सोडले तर त्याचा फायदा परिसरातील गावांना होणार आहे. राणंद तलावात पाणी सोडण्यासाठी येणारे वीजबील शेतकर्‍यांच्या ऊसबिलातून संग्राम देशमुख व प्रभाकर घार्गे यांच्या साखर कारखान्यातून भरण्याचे कबूल करण्यात आले आहे. हे पाणी मिळाले तर पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍न मिटणार आहे.