Breaking News

नाभिक महामंडळाने जाहीर केले कर्तनाचे नवे दर जाहीर


सातारा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळाने एक जानेवारीपासून कर्तनसेवचे नवे दर जाहीर केले असून ग्रामीण भागात केसदाढीसाठी 80 रुपये, तर शहरी भागातील सलूनमध्ये केस, दाढीसाठी 100 रूपये दर निश्‍चित करण्यात आले आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या हेअर स्टाईल, दाढी कोरणे आदी अन्य सेवांचा मोबदला त्यांच्या कलेप्रमाणे आकारण्यात येईल. त्याचबरोबर वातानुकुलीत व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त केसकर्तनालयात वेगळे दर असतील, असे महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सातारा जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आले आहेत.

महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सातार्‍यातील बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. याबाबतच्या प्रसिध्दीपत्रकात जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी म्हटले आहे की, दिवसेंदिवस सर्वत्रच वाढत चाललेली महागाई आणि केसकर्तनालयामध्ये लागणारी सौंदयप्रसाधने व साहित्यांचे जीएसटीसह वाढलेले दर यामुळे केसकर्तनालयातील सेवेचे दर सर्वत्र मोठया प्रमाणात नविन वर्षापासून वाढणार आहेत. हे निश्‍चित असले तरी जिल्हयातील दुष्काळाची परीस्थिती भयानक आहे. आमची बांधीलकी म्हणूनच आम्ही सलूनमधील सेवांच्या दरात मोठी वाढ न करता अल्पशी वाढ केली असून एक जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. 

बैठकीत कार्याध्यक्ष अंबादास दळवी म्हणाले, दुष्काळाच्या झळांचा विपरीत परिणाम नाभिकसेवेच्या व्यवसायांवरही होत आहे. बहुतांश सलून व्यावसायिक भाडपट्टीच्या गाळ्यामध्ये आहेत. वाढलेली भाडे, विजेची दरवाढ, सेवा सुविधा व कारागिरांची मजूरी या सर्वांची गोळाबेरीज केली तर झपाटयाने वाढत असलेल्या महागाईत सलूनचालक व कारागीर आज अडचणीत आले आहेत. मात्र त्यातूनही तीन वर्षातून पहील्यांदाच ही अल्पशी दरवाढ करण्यात येत आहे. 

जिल्हा उपाध्यक्ष किशोर काशिद यांनी सर्व समाजबांधवांना आवाहन केले की, अधिकाधिक सर्वोत्तम सेवा दिल्यानंतर ग्राहक चांगला दर देतात. त्यामुळे स्पर्धेच्या काळात व आधुनिकतेत टिकण्यासाठी सर्व कारागीरांनी नवनवीन कला अवघत करुन टिकणे आणि टिकवणे महत्वाचे आहे. 

जिल्हा सचिव अजित काशिद यांनी सांगीतले की, महाराष्ट्र नाभिक महामंडळ या दुष्काळात सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांसोबतच आहे. त्यामुळेच स्वतःच्या पोटाला चिमटा घेवूनच हा आपल्या सर्वसामान्यांसाठी महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. यावेळी महामंडळाचे ज्येष्ठ नेते भाऊ दळवी, उपाध्यक्ष बापूसाहेब काशिद, जेष्ठ नेते चंद्रकांत जगताप, पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकरराव मर्दाने, राज्य सदस्य विठठल महाराज गायकवाड, अशोक सुर्यवंशी, सुरेश पवार, महेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सपकाळ, प्रकाश वास्के, प्रमोद देवकर यांनी सर्वांना मार्गदर्शने केले. ज्या नाभिक समाजबांधवांना सलूनसाठी नवीन खुर्ची खरेदी करावयाच्या आहेत. त्यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फेच्यावतीने मूळ किंमतीत सवलत मिळवून देण्यात येणार असून त्यांना खरेदीसाठी कर्जपुरवठाही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सचिन यादव यांनी प्रास्ताविक केले. नीलेश साळुंखे यांनी स्वागत केले. श्रीकांत पवार यांनी सत्कार केले. जिल्हा कार्यकारणी सदस्य बाबुराव रणदिवे यांनी आभार मानले. बैठकीस महामंडळाचे सातारा तालुकाध्यक्ष पांडूरंग राऊत, कार्याध्यक्ष बंटीराजे काशिद, सातारा शहर अध्यक्ष गणेश वाघमारे, जावळी व महाबळेश्‍वर तालुकाध्यक्ष राजेंद्र निकम, वाई तालुकाध्यक्ष रमेश जाधव, कोरगांव तालुकाध्यक्ष रमेश पवार, नितीन साळुंखे, कोरेगांव शहराध्यक्ष सागर पवार, जिल्हा प्रवक्ते दशरथमहाराज जाधव, खंडाळा तालुकाध्यक्ष किसन पवार, संघटक बाळासाहेब पवार, फलटण तालुकाध्यक्ष भास्करराव कर्वे यांच्यासह विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.