Breaking News

अल्पसंख्याक विकासाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना झाला पाहिजे-हाजी अरफात शेखबीड, (प्रतिनिधी)-शासन अल्पसंख्याकांसाठीच्या विविध विकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना झाला पाहिजे. कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. यासाठी सर्व संबंधितांनी अधिक अचूकरित्या प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक विभागाच्या पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधिक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलतांना अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख म्हणाले की, जिल्हयातील संबंधित अधिकार्‍यांनी आपल्या विभागामार्फत राबवण्यात येणा-या अल्पसंख्याक योजनांची अद्यावत माहिती ठेवून योग्य आणि पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा तत्परतेने लाभ मिळेल, यादृष्टीने संबंधित अधिकार्‍यांनी काम करण्याची गरज आहे. तसेच योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी अधिकार्‍यांनी सर्तक राहून लाभार्थ्यांपर्यंत वेळेत योजनेचे लाभ पोहचविण्याबर संबंधितांनी लक्ष द्यावे. या कामात दिरंगाई करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍याविरुध्द आयोगामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

अल्पसंख्यांक समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्न करत असून या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी व योजनांचा प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आयोगामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल असे सांगून पोलीस विभागांने प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात जाणीवपूर्वक काही वाद,विवाद,गुन्हे घडवून आणल्या जात नाही ना याबाबत सतर्कता बाळगुन सामंजस्यपूर्वक स्थानिक वाद शांततापूर्वक मिटवावे. ग्रामीण,शहरी सर्व ठिकाणी सर्व समाजात सलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे. 

असेही अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अल्पसंख्यांक समाजासाठी शासन राबवित असलेल्या योजना जिल्हा प्रशासनामार्फत यशस्वीपणे राबवित असून विभागनिहाय सविस्तर माहिती अध्यक्ष हाजी अरफात शेख यांना करुन दिली. व जिल्हयातील अल्पसंख्यांक समाजातील पात्र लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी, शिक्षणाधिकारी (मा) भगवान सोनवणे, राजेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी श्रीमती उस्मानी नजमा यांच्यासह अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.