Breaking News

मुख्यमंत्री आले अन् रस्त्याचे भाग्य उजळले...!राकेश हिरे
कळवण प्रतिनिधी-गेल्या चार ते पाच वर्षांपासून कळवण ते नांदुरी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्याची मागणी सर्वसामान्यांनी वेळोवेळी करूनसुद्धा हे खड्डे काही बुजले गेले नाहीत.सामाजिक संघटनांनी आंदोलनाचे इशारे देऊनही सुस्तावलेला सार्वजनिक बांधकाम विभाग काही केल्या  जागा होईना.मग काय आश्चर्य,मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला अन्  या रस्त्याने स्वतः मुख्यमंत्री प्रवास करणार म्हटल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आणि एका दिवसात कळवण-नांदुरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची किमया अगदी लीलया साधली गेली.जे खड्डे बुजवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक चार ते पाच वर्ष आशाळभूत होऊन वाट बघत राहिले,खड्ड्यांमधून नाईलाजाने प्रवास करत राहिले तेच खड्डे मुख्यमंत्र्यांसाठी एका दिवसात बुजले गेले.त्यामुळे मुख्यमंत्री आले अन्  कळवण -नांदुरी रस्त्याचे भाग्य उजळले अशीच चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये आहे.

                कळवण तालुका हा एकेकाळी दर्जेदार रस्त्यांसाठी ओळखला जायचा.मात्र गेल्या काही वर्षात  तालुक्यातल्या काही महत्वाच्या रस्त्यांची दुरावस्था झाली.त्यातला कळवण-नांदुरी हा एक महत्वाचा रस्ता.कळवण ची सर्वसामान्य जनता याच रस्त्याने पुढे नाशिकला जाते.कळवण ते नांदुरी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले.नांदुरीच्या मागे मागे तर खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली.रस्ता दुरुस्त करावा म्हणून नागरिकांवर विनवण्या करण्याची वेळ आली.सामाजिक संघटनांनी आंदोलनाचे इशारे दिले.आंदोलनेही झाली.मात्र खड्डे काही केल्या बुजवले गेले नाहीत.सार्वजनिक बांधकाम विभागानेही कधी त्याकडे गांभीर्याने बघितले नाही.त्यामुळे जनतेनेही रस्ता दुरुस्त होण्याची आशा सोडून दिली.

              पण रविवारी मात्र जनतेला आश्चर्याचा धक्काच बसला.दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री येणार अन् ह्या  रस्त्याने प्रवास करणार म्हटल्यावर त्यांनाही ह्या खड्ड्यांचा सामना करावाच लागेल असे वाटत असतांना 'कर्तव्यदक्ष' सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आणि ते युद्धपातळीवर पूर्णही केले.आता सार्वजनिक बांधकाम विभागाने हीच तत्परता तालुक्यातल्या इतरही रस्त्यांच्या बाबतीत दाखवली तर किती बरे होईल अशीच चर्चा कळवण तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये झाली तर त्यात नवल तरी काय...?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदुरी येथे आले आणि कळवण-नांदुरी रस्त्याचे भाग्य रातोरात बदलले.या रस्त्यावरील सर्वच खड्डे भरल्याने इथे कधी खड्डे तरी असतील का असाही प्रश्न उपस्थित होईल असे काम सार्वजनिक बांधकामने तत्परतेने केले.या रस्त्याहूनही वाईट अवस्था कळवण च्या मेनरोडची असल्याने आणि खड्डे व धुळीच्या त्रासाने कळवणकर त्रस्त असल्याने हा रास्ता सुधारावा व प्रशासन जागे व्हावे यासाठी 'मुख्यमंत्री साहेब,एकदा कळवण शहरातही या' असेच म्हणण्याची वेळ कळवणकरांवर आली आहे.