Breaking News

सातार्‍यातील न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन


सातारा (प्रतिनिधी) : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा 97 वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व शाळेच्या माजी विद्यार्थिनी अभिनेत्री श्रूती अत्रे म्हणाल्या की, जीवनात करिअर निवडताना प्रथम शिक्षण महत्त्वाचे आहे. देशाचे सुजाण नागरिक बनण्यासाठी आत्मविश्‍वास अंगी बाळगावा कोणत्याही क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी शिक्षणाला विसरू नका.यावेळी मुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी, संमेलनाध्यक्षा सुजाता पाटील, उपाध्यक्षा शालिनी जाधव यांच्यासह पर्यवेक्षक दिलीप रावडे, लता दळवी, नीलम तिमीरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 


प्रास्ताविक विवेक नाईक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय जान्हवी देशपांडे यांनी करून दिला. कलाशिक्षक घनश्याम नवले यांनी तत्काळ काढलेले स्केच श्रुती अत्रे यांना प्रदान करण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळ्यात शाळेच्या विविध शैक्षणिक स्पर्धा माध्यमिक शालांत विविध विषय वर्गात प्रथम आलेल्या सुमारे 45 मुला-मुलींचा पारितोषिक वितरण सोहळाही यावेळी झाला. शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या मुला मुलींनी सादर केलेल्या सुमारे 28 समूहनृत्य, संस्कृत नाटिका, बालनाट्य, एकपात्री आदी कार्यक्रमांचे श्रृती अत्रे यांनी कौतुक केले व कलाकारांचा उत्साह वाढवला. यंदाच्या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच स्टेजसमोर संगीत, चित्रकला व शिल्पकला यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी करून दाखवले. त्यामध्ये बालशिल्पकार मंदार महेश लोहार याने गणेश शिल्प शाडूच्या मातीपासून प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखवले. तसेच उत्कृष्ट चित्रकार पारस वंजारी यांनी गणेश पेंटिंग रचनाकार श्रेया प्रभुणे हिने जलरंगात नृत्यांगणांचे पेंटिंग सादर केले व खुशी बैरागी या विद्यार्थिनीने जलरंगात निसर्ग देखावा उत्कृष्टरित्या सादर केला. अशा या नाविन्यपूर्ण उपक्रम आज सर्व प्रेक्षक व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून बाल कलाकारांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन शाळेतील कलाशिक्षक घनश्याम नवले व संदीप माळी यांनी केले. कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक अण्णा कंग्राळकर व ज्येष्ठ कलाशिक्षक एस. व्ही. कुलकर्णी आदींसह अनेक माजी शिक्षक, शिक्षिका कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.