Breaking News

डॉ.आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला भीमसागर


 'भारतरत्न' डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभर त्यांना आदरांजली वाहण्यात येतं आहे. मुंबईत दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी देशभरातून दाखल झाले आहेत. काल रात्री बारा वाजता चैत्यभूमीत बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानंतर आंबेडकरी अनुयायींनी चैत्यभूमीत वंदन करण्यास सुरुवात केली. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या आंबेडकरी अनुयायींची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क मैदानात सोयी सुविधांची मोठी व्यवस्था केली आहे. सकाळी दहाच्या सुमारास राज्यपाल आणि मुख्यमंत्री चैत्यभूमीवर बाबाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत. त्यामुळे दादरला भीमसागराचे रूप आले आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाजी पार्कवर यंदा अंथरलेल्या हिरव्या रंगाच्या कापडी जाळीमुळे अनुयायींची धुळीच्या त्रासापासून मुक्तता झाली आहे.
दादर चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी महापालिका, बेस्टप्रमाणेच रेल्वेनेही तयारी केली आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेने आज लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन जादा तिकीट खिडक्यांसह, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांचा ताफाही तैनात केला आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरातली वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे. दादर परिसरातील सर्व फेरीवाल्यांना हटवून महत्त्वाच्या मार्गांवरील पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे.