Breaking News

कोयना धरणास उत्कृष्ट धरण व्यवस्थापनाचा राष्ट्रीय पुरस्कार; केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळाकडून गौरव


पाटण (राजेंद्र लोंढे) : केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळ या संस्थेने सन 2018 चा उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा देशपातळीवरचा पुरस्कार नुकताच कोयना धरणास जाहीर केला आहे. या संस्थेमार्फत 1927 पासून जल आणि विद्युत क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या विभागांना व संस्थांना गौरविण्यात येत आहे. या पुरस्काराबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील कोयना धरण हे मोठ्या व महत्वाच्या धरणांपैकी एक धरण आहे. सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या महाबळेश्‍वर येथून उगम पावणार्‍या कोयना नदीवर सन 1954 ते 1964 या कालावधीमध्ये हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी तसेच सिंचनासाठी वापरण्यात येत असून जलविद्युत प्रकल्पाची स्थापित विद्युत निर्मिती क्षमता 1960 मेगावॅट एवढी आहे. धरणातून होणार्‍या उर्जा निर्मितीमुळे आपल्या राज्यात औद्योगिक विकास होण्यास हातभार लागला आहे. त्यामुळेच या धरणाला महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते. कोयना धरणाची लांबी 807 मीटर असून उंची 103 मीटर आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 2981 दलघमी (105 टीएमसी) एवढी आहे. या धरणामुळे 892 वर्ग किलोमीटर क्षेत्रावर पसरलेला जलाशय निर्माण झाला असून त्याला शिवाजीसागर या नावाने ओळखले जाते. धरणातून पूराचे पाणी सोडण्यासाठी 6 वक्राकार दरवाजे बसविण्यात आले असून या धरणामुळे पूरनियंत्रण होण्यास हातभार लागला आहे.

10 डिसेंवर 1967 रोजी कोयनानगर येथे 6.3 रिक्टर क्षमतेचा भूकंप झाल्यामुळे कोयना धरणाला तडे गेले होते. तेव्हापासून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जलाशय प्रेरित भूकंप वर संशोधनास सुरुवात झाली आहे. सन 1968 मध्ये धरणास पडलेल्या भेगा ग्राऊटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बुजविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सन 1973 मध्ये या धरणाचा अपरिवाह भागाचे तर सन 2006 मध्ये परिवाह भागाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात आले होते. अशा प्रकारे धरण पुर्णपणे भुकंपरोधीत करण्यात आले आहे. धरणाचे बांधकाम होऊन आता 55 वर्ष झाले आहेत तर कोयना भुकंपाला देखील 50 वर्ष झाले आहेत. केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत कोयना धरणास देण्यात आलेला पुरस्कार हा गेल्या 50 वर्षात धरणाची निगा उत्कृष्ट पध्दतीने राखल्याने देण्यात आला आहे. या धरणाचा इतिहास शोधला असता, असे आढळून येते की, 19 व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच या धरणाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली होती. 1918 नंतर पहिले जागतिक महायुध्द संपल्यानंतर टाटा कंपनीने कोयना प्रकल्प बांधण्यासाठी सर्व्हेक्षण सुरु केले. मात्र त्यानंतर 1928 च्या जागतिक मंदीमुळे हा प्रकल्प रेंगाळला. 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प हाती घ्यायचे ठरवले. त्यासाठी सन 1951 मद्ये कोयना धरण विभाग सुरु करण्यात आला. सन 1953 मध्ये प्रकल्पास मान्यता मिळाली आणि सन 1954 मध्ये बांधकामास सुरुवात झाली. धरणाचे बांधकाम 1964 मध्ये पूर्ण करण्यात आले. 

या प्रकल्पांतर्गत चार धरणे बांधण्यात आली आहेत. त्यापैकी कोयना धरण आणि कोळकेवाडी ही दोन मोठी धरणे आहेत. कोयना धरणातील पाण्याचा वापर करून पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या टप्प्यातील विद्युतनिर्मिती केंद्रांद्वारे उर्जा निर्मिती करण्यात येते. त्यासाठी बोगद्याद्वारे पाणी जलविदुत केंद्रामध्ये आणले जाते. या तीनही टप्प्यातून जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी कोळकेवाडी धरणात साठवले जाते. त्यानंतर कोळकेवाडी धरणातील पाणी तिसर्‍या टप्प्यातील जलविद्युत केंद्रात उर्जा निर्मिती करिता वापरले जाते. त्यानंतर हे पाणी वशिष्टी नदीद्वारे अरबी समुद्राला जाऊन मिळते.प्रकल्पाचे वैशिष्ट म्हणजे या प्रकल्पातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरण्यासाठी दोन वेळा (सन 2002 मध्ये व सन 2015 मध्ये) लेक टॅपिंग करण्यात आले व हा देशातीलच नव्हे तर अशिया खंडातील पहिलाच प्रयोग होता व ही दोन्ही लेक टॅप यशस्वी झाली आहेत. केंद्रिय सिंचन आणि उर्जा मंडळामार्फत सन 2018 सालचा उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा देशपातळीवरचा पुरस्कार कोयना धरणाला जाहीर होणे ही आपल्या राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.