Breaking News

सुरक्षा दलाच्या गोळीबारात सात नागरिक ठार


तीन दहशतवाद्यांचा खात्मा; दोन डझन नागरिक आणि दोन जवानही जखमी


श्रीनगर  : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या भीषण चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईमध्ये एका जवानाला वीरमरण आले. या कारवाईनंतर हिंसक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सात नागरिकांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात जवळपास दोन डझन नागरिक जखमी झाले आहेत. दोन जवानसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पीडीपीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही राज्यपालांना टीकेचे लक्ष्य केले आहे. 

दक्षिण जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील सिरनू गावात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर अहवालातून मिळाली. त्याचबरोबर लष्कराशी फितूर झालेला झहुर अहमद सिरनूमध्येच लपल्याची माहिती मिळाली. झहुर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडल्याचे कळताच जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. झहुरही त्याच गावामधील होता. झहुर गेल्या वर्षीपासून बारामुल्ला जिल्ह्यातील गांटमुल्ला लष्कर विभागातून गायब झाला होता. त्यानंतर तो दहशतवादी गटांना जावून मिळाला होता. 

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांची 25 मिनिटे चकमक चालली. या चकमकीत त्या लपलेल्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. याच दरम्यान जमावाने लष्करांच्या वाहनांवर चढण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगविण्यासाठी लष्कराकडून हवेत गोळीबार करण्यात आला; पण जमाव पांगू न शकल्याने सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात सात जणांना प्राण गमवावा लागला. जखमी झालेल्या युवकांमध्ये काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या मोठ्या चकमकीनंतर दक्षिण काश्मीरमधील मोबाईल सेवा खंडित करणात आली आहे. काश्मीरमध्ये आजच्या कारवाईत  नागरिक बळी पडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. ज्येष्ठ नेते ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.  माजी पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनीही सामान्य नागरिक चकमकीत मृत्यू होणे दुःखद असल्याची प्रतिक्रिया दिली.