Breaking News

ओवेसींना हाताशी धरून भाजपचा दंगली घडविण्याचा प्रयत्नः राज ठाकरे


मुंबई (प्रतिनिधी)ः राम मंदिराच्या मुद्द्यावरून ओवेसींसारख्या लोकांना हाताशी घेऊन देशात दंगली घडविण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

ठाकरे यांनी सांगितले, की मला दिल्लीतून एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने ही माहिती दिली. राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशातील जनतेच्या भावनांशी खेळ सुरू आहे. सत्तेवरील भाजप सरकारने गेली साडेचार वर्षे विकासकामे केली नाहीत. त्यामुळे जनतेसमोर त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काहीच नाही. नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लिम दंगली घडवून निवडणूक लढवायची आहे, असा गंभीर आरोप राज यांनी केला आहे. 

राम मंदिर हे 2019 च्या निवडणुकीनंतर व्हायला हवे. कारण सरकारला हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करायचे आहे. मते मागायची हा एककलमी कार्यक्रम सध्या या सरकारचा असणार आहे, त्यामुळे जनतेने सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात कुठेही दंगली होणार नाहीत. याबाबत कुणाकडे माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे, असे ते म्हणाले.