Breaking News

फलटण पालिकेने करवाढ रद्द न केल्यास ठिय्या आंदोलन : अ‍ॅड. निकम
फलटण, (प्रतिनिधी) : फलटण शहरात नगरपालिका अशा काय सुविधा पुरवत आहे की, जेणे करून मोठ्या प्रमाणावर कर वाढवावा लागला? पालिकेतर्फे नागरीकांना कोणत्या मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत? हे जाहीर करावे. एका बाजूला सुविधा देत नाही आणि दुसर्‍या बाजूला कर वाढवताय, नागरिकांच्या डोक्यावर कराचे ओझे लादाताय, मनमानी कारभार करायला ही तुघलकाची सत्ता आहे काय?, अशी टीका अँड. नरसिंग निकम यांनी केली. 

फलटण नगरपरिषदेतर्फे खाजगी संस्थेच्या माध्यमातून शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन करून केलेली करआकारणी पूर्णतः चुकीची असल्याने सदर करआकारणी तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी आज माळजाई मंदिराच्या प्रांगणात आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली व त्यानंतर नगरपरिषदेत जाऊन मागणीचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी काटकर यांना देण्यात आले. त्या वेळी अ‍ॅड. निकम, विरोधी पक्षनेता समशेरसिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष सहयाद्री कदम, नगरसेवक अशोक जाधव, सचिन सुर्यवंशी (बेडके), सचिन अहिवळे, नगरसेविका सौ मदालसा कुंभार, शहराध्यक्ष उदय मांढरे, तुकाराम शिंदे, सुशांत निंबाळकर, रवींद्र फडतरे, शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर उपस्थित होते.

माळजाई मंदिरातील या बैठकीत मान्यवर, व्यापारी व नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त करून करवाढ रद्द झाली पाहीजे, याची एकमुखी मागणी केली. त्यानंतर करवाढ रद्द करण्याचे निवेदन मुख्याधिकार्‍यांकडे देऊन जर मागणी पूर्ण झाली नाही तर दि 12 डिसेंंबरला ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. सदरची करवाढ ही नियमाप्रमाणे असून मागील कारवाई ही 2012 - 2013 मध्ये करण्यात आली होती त्यानंतर चार वर्षानी कर मूल्यांकन करायचे होते. परंतू नगरपालिका निवडणुकीमुळे मूल्यांकन करण्यात आले नव्हते, तेच मूल्यांकन आता आपण करतोय म्हणजे सहा वर्षांनी करवाढ होत असल्याचे स्पष्टीकरण मुख्यधिकारी काटकर यांनी नागरिकांना दिले, परंतू सन 2016 ला नागरिकांनी मालमत्तेचे मूल्यांकन करण्यास विरोध केला नव्हता. नगरपालिकेने तिच्या सोयीने मूल्याकंन पुढे ढकलल्याचा फटका सामान्य नागरिकांना का देता?, अशी टीकाही नागरिकांनी केली.

पालिकेने मालमत्तांचे केलेले मूल्यांकन व त्यावर केलेली करआकारणी बेकायदेशीर असून नागरीकांच्या हिताच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. ही आकारणी रद्द न झाल्यास 12 डिसेंबरला तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही या वेळी नागरीकांनी सांगितले. मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर अँड. नरसिंह निकम, समशेरसिंह नाईक निंबाळकर, सह्याद्री कदम, अशोक जाधव, सचिन अहिवळे, सचिन सूर्यवंशी बेडके, मदलसा कुंभार, मीना नेवसे, मंगलादेवी नाईक निंबाळकर, ज्योती खरात, सुशांत निंबाळकर, धनंजय महामुलकर, रविंद्र बर्गे, स्वप्निल मुळीक, अभिजीत नाईक निंबाळकर, राहुल शहा यांच्या सह्या आहेत.