Breaking News

अग्रलेख- सडकी मानसिकता


जग 21 व्या शतकात असताना आपली मानसिकता अजूनही मध्ययुगीन आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्रसंघ विधवांचा सन्मान करीत असताना आपण अजूनही विधवांना माणूस म्हणून वागणूक देत नाही. त्यांच्या वाट्याला कायम उपेक्षा, तिरस्कार येतो. दुःखाच्या प्रसंगात तिला सहभागी करून घेताना आनंदाच्या प्रसंगात मात्र तिला जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते. मुद्दे संपले, सांगायला काही राहिले नाही, की महिलांविषयी टिप्पणी करून मोकळे होता येते. त्यात कसला आला आहे पुरुषार्थ? परंतु, मध्ययुगीन मानसिकता जपणार्‍यांना ते कोण सांगणार आणि त्यांना ते पटणार का, हे प्रश्‍न उरतात. ज्यांनी आदर्श घालून द्यायचे, तेच महिलांचा अवमान करणारी विधाने कळत नकळत करायला लागले, की त्याचे अनुकरण इतर करतात. खरे तर आपल्याकडे महर्षि कर्वे, महात्मा फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्यासारखी कितीतरी उदाहरणे आहेत, की ज्यांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी, त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; परंतु त्यांचा आदर्श घेण्याऐवजी आपला आदर्श मनू असेल, तर मग प्रगतीची, सन्मानाची दारे बंदच होणार. खरे तर पतीच्या जाण्यानंतर विधवा म्हणून जगणार्‍या तिचे अस्तित्व संपते का? तिला जगण्याचा अधिकार उरतच नाही का? पत्नीच्या निधनानंतर त्याच्या दुसर्‍या लग्नाला समाज सहजपणे मान्यता देतो. याउलट पतीच्या निधनानंतर तिने दुसर्‍या लग्नाचा विचार केला, लग्न केले, तर समाज तिला प्रथा, रुढी-परंपरेच्या पिंजर्‍यात उभा करतो. तिने विधवा म्हणून जगण्याचा निर्णय घेतला, तर तिच्या चारित्र्याच्या चौकटीत अडकण्याचा प्रयत्न होतो. तिच्या स्वातंत्र्यावर आजही निर्बंध लावले जातात. स्वतंत्र जगात विधवा म्हणून ती पारतंत्र्यात जगते. पतीमागे ती संसार उभा करते. मुलांना शिकवून मोठे करते. तिच्या या वेगळ्या योगदानाची दखल घेऊन तिचा सन्मान करण्याऐवजी तिचा अवमान केला जातो. हळदीकुंकू, विवाह समारंभ आदींत तिला दूर ठेवले जाते. विधवांचे चेहरे ही न पाहणारे काही धर्ममार्तंड आपल्याकडे होऊन गेले. त्यांच्या घरात कुणीच विधवा झाले नाही का, असा प्रश्‍न एकदा तरी त्यांना विचारायला हवा. हे सारे आठवण्याचे कारण राजस्थानातील निवडणुकीत महिलांविषयी झालेली शेरेबाजी हेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद यादव आणि एका महिला आमदारानेच केलेले वक्तव्य महिलांना अजूनही आपण माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाही, याचे द्योतक आहे.

संकुचित विचारांच्या समाजामुळे एका विधवेचे आयुष्य अवघड बनते. ती पण एक माणूस आहे, तिलाही मन, भावना आहेत. तिची आयुष्याबद्दल असलेली स्वप्ने पतीच्या निधनानंतर संपतात का? पती, तिच्या आयुष्यातील आधार गेल्यामुळे पूर्णपणे खचलेली असताना तिला उभारी देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना तिला अशी वागणूक मिळते, की नको ते जिणे असे होऊन बसते. हे कुठे तरी थांबवायला हवे. यासाठी आपण सर्वांनी एक पाउल पुढे टाकले पाहिजे. बदल हा स्व:तापसूनच करायला हवा. यासाठी दृष्टी बदलायला हवी. विधवा स्त्रिला माणूस म्हणून बघण्याची गरज आहे. तेव्हाच समाजाकडून होणारी तिची फरपट थांबेल आणि विधवा म्हणून तिला सन्मानाने जगता येईल. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने समाजातील विधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवसाची सुरुवात केली. समाजातील सर्व वयाच्या, संस्कृतीच्या विधवांच्या परिस्थितीला त्यांच्या जगण्याला विशेष ओळख देण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विधवा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने 23 जून 2011 ला केली. आता त्याला सात वर्षे झाली आहेत. तरीही आपल्या नेत्यांना विधवांविषयी काय वक्तव्य करावे, हे कळत नाही. विधवेला प्रत्येक दिवस ताठ मानेने जगता आला पाहिजे. पतीच्या निधनानंतर तिला भरभरून जगण्याचा अन् सन्मानाने मिरवण्याचा अधिकार आहे. बंधनाच्या पिंजर्‍यातून तिला जेव्हा मुक्ती मिळेल, तेव्हाच तिचा खर्‍या अर्थाने तिला समाजात सन्मान, गौरव होईल. विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधाने करण्यात भारतीय जनता पक्षातील अनेक वाचाळवीर आघाडीवर असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील काँग्रेसवर टीका करण्याच्या नादात हीन पातळी गाठली. काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आसूड ओढताना मोदी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना लक्ष्य करीत ’काँग्रेसचा विधवा पेन्शन घोटाळा’ असा उल्लेख केला. राजस्थानमध्ये जयपूरच्या प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसची ही कोणती विधवा होती, जिच्या बँक खात्यामध्ये निवृत्तीवेतनाची रक्कम जमा झाली?’ या वक्तव्याद्वारे मोदी यांनी सोनिया गांधी यांचा अपमान केला.


सोनिया गांधी यांनी सासू इंदिरा गांधी यांचे देशासाठी बलिदान पाहिले आहे. एलटीटीईने घेतलेला पतीचा बळी पाहिला आहे. त्यांना देशप्रेम शिकविण्याचा प्रयत्न काही नेते करतात. काँग्रेसच्या चुकीच्या कारभारावर टीका करण्याचा अधिकार मोदी यांना आहे; परंतु ते सडकछाप भाषा वापरीत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाचा अवमान करू नका, असा जो सल्ला दिला, तो जास्त महत्त्चाचा आहे. बघून घेतो, ही भाषा पंतप्रधानांना शोभत नाही. अर्थात एकटे मोदीच अशी विधाने करतात, असे नाही, तर त्यांच्यासमवेत काही काळ राष्ट्रीय लोकशाही आघाडीत घालविलेले आणि आता दूर झालेले शरद यादव हे ही महिलाांबाबत वादग्रस्त टिप्पण्या करण्यात आघाडीवर असतात. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी यादव यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. यादव यांनी हे विधान करून फक्त मलाच दुखावलेले नाही, तर त्यांनी सर्व महिलांचा अपमान केला आहे, हे त्यांचे विधान खरेच आहे. ‘वसुंधरा राजे आमच्या मध्य प्रदेशची कन्या आहेत. त्यांना आता विश्रांती द्या, त्या खूपच थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत, यापूर्वी त्या चांगल्या बारीक होत्या’, असे वक्तव्य यादव यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर यादव यांनी आपण हे मस्करीत बोललो होतो. त्यांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता असे म्हटले असले, तरी यादव यांच्या शरीरवाचक टोमण्याची दखल निवडणूक आयोगानेही घ्यायला हवी होती. यादव यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीने अशा खालच्या पातळीला जाऊन वक्तव्ये करणे अशोभनीय आहे. राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध आणि बालविवाहाविरुद्ध आवाज उठविला. देशात सतीबंदी कायदा आहे. बालविवाहालाही बंदी आहे. अशा स्थितीत कायद्याला थेट आव्हान देऊन सती आणि बालविवाहाचे समर्थन भाजपच्याच एका आमदार, ते ही महिलेने करावे हा पुन्हा महिलांना मध्ययुगीन युगात ढकलण्याचा प्रकार आहे. पुरुषी मानसिकतेबरोबरच महिलांची मानसिकताही बदलणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करणारी ही घटना आहे.