Breaking News

नितीन गडकरी कार्यक्रमात कोसळले; उपचारानंतर बरेअहमदनगर (प्रतिनिधी) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदवीप्रदान कार्यक्रमाला हजर होते. गडकरी यांचे भाषण झाल्यानंतर ते राष्ट्रगीतासाठी उभे राहिले असता अचानक त्यांना भोवळ आली आणि ते व्यासपीठावरच कोसळले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली.

गडकरी यांना भोवळ आल्यामुळे एकच धावपळ उडाली. त्यांना तातडीने राहुरी येथील विश्रमगृहावर नेण्यात आले. तिथे डॉक्टरांची टीम, जिल्हाधिकारी, पोलिस उपमहानिरीक्षक उपस्थित होते. विश्रामगृहावर उपचार घेतल्यानंतर गडकरी शिर्डीला पोहोचले. तिथे साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली तब्येत ठीक असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असे सांगितले. गडकरी यांनी ट्विट करून प्रकृतीबद्दल माहिती दिली. माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थोडीशी तब्येत बिघडली होती. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी मला मदत केली. आता माझी तब्येत ठीक आहे, असे त्यांनी सांगितले. राहुरीला कार्यक्रमामध्ये गुदरमल्यासारखे झाले. त्यातच कार्यक्रमस्थळी सूट घातलेला होता. हवा घेण्यास अडचण आली. त्यामुळे मला चक्कर आली. आता माझी तब्येत ठीक आहे काळजी कऱण्याचे काम नाही, असे सांगून त्यांनी चौकशी करणार्‍या सर्वांचे आभार मानले. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर गडकरी विशेष विमानाने नागपूरला रवाना झाले. 

या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी ट्विटरवरून गडकरींना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. अधिक कामामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. गडकरीजी काळजी घ्या. तुमची प्रकृती चांगली राहो ही शुभेच्छा असे ट्विट पवार यांनी केले आहे.