Breaking News

सातारा जिल्ह्यात आजपासून ईव्हीएम, व्हिव्हिपॅटची प्रात्यक्षिके


सातारा (प्रतिनिधी): जिल्ह्यातील मतदारांना ईव्हिएम व्हिव्हिपॅटची ओळख व्हावी व ते हाताळता यावे, यासाठी रविवार, दि.16 डिसेंबरपासून जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यक्रम सुरू होत आहे. मतदारांसमोर प्रात्यक्षिके सादर करतान ईव्हीएम व्हिव्हिपॅटबद्दल कोणी काही प्रश्‍न उपस्थित केल्यास त्यांच्या प्रश्‍नांचे निरसन त्याचवेळी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज दिल्या. येथील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयात ईव्हीएम व्हिव्हिपॅट मशिन कसे हाताळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 


त्यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल बोलत होत्या. या कार्यशाळेस उप जिल्हा निवडणूक अधिकारी पूनम मेहता यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. या कार्यशाळेत खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव यांनी ईव्हीएम व्हिव्हिपॅट कशी हाताळावी याबाबत प्रात्यक्षिके सादर केली. इव्हिएम व्हिव्हिपॅट मशिन हाताळताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, ज्या गावात इव्हिएम व्हिव्हिपॅट मशिनचे प्रात्यक्षिक होईल त्यावेळी गावचे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, बीएलओ, पोलीस पाटील यांनी उपस्थित रहावे. ईव्हिएम व्हिव्हिपॅट प्रात्यक्षिकावेळी निवडणूक विभागाकडून तयार करण्यात आलेल्या ईव्हीएम व्हिव्हिपॅट मशिनबाबत चित्रफीत तयार करण्यात आली आहे ही चित्रफीत उपस्थितांना दाखवावी. ज्या ठिकाणी प्रात्यक्षिक होणार आहे, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. कार्यशाळेत प्रत्येकाने इव्हिएम व्हिव्हिपॅट ही मशिन हातळून पहावी आपल्या शंका असतील त्या विचारा, तुमच्या शंकाचे निरसन केले जाईल. ईव्हिएम व्हिव्हिपॅट मशीन प्रात्यक्षिका वेळी कोणातीही व्यक्ती किंवा राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्‍नांचे त्याचवेळी निरसन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सिंघल यांनी यावेळी केल्या. या कार्यशाळेस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.