Breaking News

माळी समाजाने परिवर्तनाचे भागीदार व्हावे : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरशेगाव,(प्रतिनिधी): भाजपा आणि आरएसएस ने बहुजनांना आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात वंचित ठेवले आहे. आजही बहुजनांची पिळवणूक सुरूच आहे. संविधानामध्ये संतांनी सांगितलेला मार्ग आहे. हाच मार्ग महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितला आहे. मात्र, सध्या संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे आता एकज्ाुटीतून परिवर्तन घडवण्याची गरज असून माळी समाजाने या परिवर्तनाचे भागीद्वार व्हावे, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.


शेगांव येथे शुक्रवारी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांच्या अध्यक्षतेखाली वंचित माळी समाज राजकीय एल्गार परिषद घेण्यात आली. या परिषदेत मार्गदर्शन करताना अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र महाडोळे होते. कार्यक्रमाला अ‍ॅड. संतोष रहाटे, सुभाष सातव, अमोल बुरुंगले, समीर आरेकर, टी. एस. कलोरे, राजेंद्र घाटे, देविदास गुरनुले, नानाजी आडे, श्रीकांत भुसारी, प्रकाश आताडकर, गजानन ठेंगडे, वसंतराव मगर, सदानंद माळी, मंगेश आंबडकर, श्रीकांत ढोमणे, मिलिंद झाडे, देवानंद फुशे, रेणूकताई सिरस्कार, सौ. महाडोळे, धनंजय सिरस्कार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी फुले, आंबेडकर यांच्या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी राजकारणात परिवर्तनाची गरज असल्याचे स्पष्ट केले. परिषदेचे प्रास्ताविक मनोज आंबडकर यांनी केले.

सरकारकडून तरुणांना व्यसनाधीन बनविण्यासाठी जोरात काम सुरु आहे. बहुजनांच्या मुलांची बौद्धिक क्षमता कमी करण्याचे काम याच सरकारने केले. माळी समाज बहुसंख्येने असूनही माळी समाजाला वाटा अत्यंत कमी आहे. या माध्यमातून लढा उभारायचा असून त्यासाठी समाजाने साथ द्यावी, असे आवाहन यावेळी आ.सिरस्कार यांनी केले. संतनागरीपासून सुरू केलेला एल्गार मुंबई आणि दिल्लीच्या तक्तापर्यंत नेणार असून राजकिय भागीदारी मिळविण्यासाठीच एकत्र आलो असल्याचे राजेंद्र महाडोळे यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रविण पेटकर तर आभार डॉ. बनकर यांनी मानले. परिषदेला माळी समाज बांधवासह भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आ. सिरस्कारांना बुलडाणा लोकसभेची उमेदवारी! अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र महाडोळे यांनी यावेळी बोलताना आ. सिरस्कार यांना बुलडाण्याचे भावी खासदार असे संबोधले, यावेळी समाजबांधवांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात याची दखल घेतली. आता परिवर्तनाची लाट आलेली आहे, या चक्राला गती द्या असे म्हणत आ. सिरस्कार यांच्या खासदारकीच्या मागणीला मान्य करत कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले आणि अप्रत्यक्षरीत्या आ. सिरस्कारांची लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.