Breaking News

पर्यायी रेल्वे मार्गाचा विषय पुरवणी विनियोजन विधेयकात जिल्ह्यासाठी शुभसंकेत, आ.सपकाळांच्या प्रयत्नांना यश बुलडाणा,(प्रतिनिधी):  वाढीव खर्चाचे कारण देत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून प्रस्तावित अकोला-खंडवा ब्रॉड गेज रेल्वे मार्गाऐवजी बुलडाणा जिल्ह्यातून जाणार्‍या पर्यायी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने सुध्दा आर्थिक सहभाग देऊन पर्यायी मार्गाची शिफारस केंद्रशासनाकडे करावी, अशी मागणी पुरवणी विनियोजन विधेयकात समाविष्ट करून घेण्यास आ. हर्षवर्धन सपकाळ यांना यश आले आहे. यापार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असलेल्या या प्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील पर्यायी मार्गाबाबत राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेचे हे संकेत समजल्या जात आहेत. अकोला - खंडवा या रेल्वे मार्गाचे मीटरगेज मधून  ब्रॉडगेज मध्ये रूपांतरण करण्याच्या प्रकल्पास भारत सरकारने मान्यता दिला आहे.

 176 कीलो मीटर लांबींचा हा मार्ग वनक्षेत्रातून जाणार असून  सुमारे 39 कीलो मीटर अंतरापर्यंत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र संरक्षण प्रकल्पामधून जाणार आहे. मेळघाट मधील ज्या क्षेत्रातून हा 39 कीलोमीटर लांबींचा रेल्वे मार्ग जाणार आहे, तो प्रदेश वाघांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.विद्यमान मार्गाने वन क्षेत्रातील केवळ 9 गावे जोडल्या जाणार असून फक्त 6950 लोकसंख्येस त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. या नऊ ही गावांमध्ये शेतजमीनीचे व उत्पादनाचे प्रमाण फारच कमी आहे. तसेच वनक्षेत्रातून जाणार असल्यामुळे या मार्गाचा या परिसरातील  औद्योगिक विकासासाठी फारसा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट आहे. तसेच या परिसरात रेल्वे मार्गामुळे रोजगारांच्या सुध्दा अत्यल्प संधी उपलब्घ होणार आहेत. सोबतच पर्यावरणाची व पर्यटन क्षेत्राची फार मोठी हानी होणार आहे.

या रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन संस्थेच्या एका उच्च स्तरीय समितीने सुध्दा  मेळघाट मधून जाणार्‍या या रेल्वे मार्गास विरोध दर्शविला असून रेल्वे प्रकल्पासाठी बुलडाणा जिल्ह्यातून जाणारा अकोट, आडेगाव, हिवरखेड ,सोनाळा, टूनकी, जामोद, कुंवरदेव हा पर्यायी मार्ग सुचविलेला आहे.