Breaking News

स्काऊटचे जिल्हा आयुक्त कैलास मोहिते यांना जीवन गौरव पुरस्कार


नगर । प्रतिनिधी -
भारत स्काऊट-गाईड  चळवळीत अमूल्य योगदान दिल्याबद्दल नगर जिल्हा आयुक्त (स्काऊट) प्राचार्य कैलासराव मोहिते यांचा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते सपत्नीक ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस्च्या वतीने जागतिक अरणगाव (ता. नगर) येथील राज्य मेळाव्याच्या उद्घाटन समारंभप्रसंगी प्राचार्य कैलास मोहिते व त्यांच्या पत्नी सौ. वत्सला मोहिते यांना गौरविण्यात आले.
प्राचार्य मोहिते रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक वर्षे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी रयत सेवक कर्मचारी बँकेचे अनेक वर्षे अध्यक्षपद भूषविले. स्काऊटमध्ये 45 वर्षे कारकीर्द गाजविणार्‍या मोहिते यांनी 5 वर्षे जिल्हाध्यक्ष तर गेली 20 वर्षे जिल्हा आयुक्त (स्काऊट) या पदावर काम केले आहे. राष्ट्रीय संस्थेचा ‘बार टू मेडल’ तसेच राज्य संस्थेचा ‘मेरिट ऑफ मेडल’ हा मानाचा बहुमानही त्यांना मिळाला आहे. या कार्याची दखल घेऊनच त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी मेळाव्याचे स्वागताध्यक्ष खा. दिलीप गांधी, राज्य मुख्य आयुक्त भा. ई. नगराळे, अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, मुख्य संयोजक शरद दळवी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, काशिनाथ बुचुडे, ज्ञानदेव पांडुळे, सुभाष पानसंबळ, दिलीप पवार आदी उपस्थित होते.