रेशीम उत्पादक शेतकर्यांचा जिल्हाकचेरीसमोर ठिय्या रेशीम अधिकारी, कर्मचारी अरेरावी करत असल्याचा आरोप
बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून रेशीम अधिकारी आणि कर्मचार्यांविरुद्ध असलेला संताप व्यक्त केला. शेतकर्यांच्या समस्येबाबत वारंवार पत्र व्यवहार करुनही संंबंधित कर्मचारी आणि प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. कोणतेही काम समाधानकारक केले जात नसुन तेथील अधिकारी आणि कर्मचारी शेतकर्यांना अरेरावीची भाषा वापरत असल्याच्या निषेधार्थ रेशीम उत्पादकांनी उपोषण करुन जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.
बीड येथील रेशीम अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकर्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत ठिय्या मांडला. शासनाने गतवर्षी महारेशीम अभियानाच्या माध्यमातून रेशीम ऑफिस व संचानालय मनरेगाच्या योजनेतून मिळणारे अनुदान व रेशीम कोषाच्या उत्पादानातून मिळणारे उत्पन्न याचे महत्व पटवून देत नवीन शेतकर्यांना रेशीम उद्योगाकडे वळविले. मात्र शेतकर्यांना पायाभूत सुविधा म्हणजेच अनुदान, अंडीपुंज, तांत्रिक मार्गदर्शन व नवीन उपक्रम, योजनांचे काम, ऑफिस व संचानालय करु शकले नाही. रेशीम उद्योगामधील परिस्थिती उद्योग करण्यासाठी शेतकरी विरोधी आहे. असे असतांना रेशीम अभियानासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत नाही. कार्यालयात गेलेल्या शेतकर्यांना अरेरावीची भाषा वापरली जाते आदिच्या निषेधार्थ रेशीम उत्पादक शेतकर्यांनी जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. शेतकर्यांना वेळेवर अंडीपुंज पुरवठा व मनरेगाचे अनुदान न मिळाल्याने आठ ते दहा कोटींचे नुकसान सहन करावे लागले त्याची भरपाई द्यावी, आधारभूत किंमतीत वाढ करावी आदि मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
Post a Comment