Breaking News

कर्ज परतफेडीचा धनादेशाचा अनादर; सहा लाखांचा दंडबीड, (प्रतिनिधी)- पुर्णवादी बँकेच्या येथील शाखेकडुन कर्जदार मंदाकिनी सदाशिव कुटे यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने कलम १३८ निगोशिएबल ऍक्टप्रमाणे सहा लाख रूपयांचा दंड व सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा न्या. भारत बुरांडे यांनी बुधवारी सुनावली.

माजलगाव येथील पुर्णवादी बँकेच्या शाखेकडुन पाच लाख रूपयांचे कर्ज मंदाकिनी सदाशिव कुटे यांनी व्यावसायासाठी घेतले होते. सदर कर्जाच्या परतफेडीसाठी पाच लाख ७८ हजार ५५९ रूपयांचा धनादेश दिला होता. सदरील धनादेश न वटल्याने या प्रकरणी फिर्यादी शाखाधिकारी रावसाहेब देशमुख यांनी कर्जदार मंदाकिनी कुटे यांच्याविरूध्द न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. 

सदरील धनादेश अनादरीत झाल्याने सदरील प्रकरणात पाच साक्षीदार तपासण्यात आले. तर फिर्यादी रावसाहेब देशमुख यांच्या साक्षीला आधार करून मंदाकिनी कुटे यांना सहा लाख रूपयांचा दंड व सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सहा लाख रूपये न दिल्यास पुन्हा सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बँकेतर्फे ऍड. अरूण लवुळकर यांनी काम पाहिले.