Breaking News

मराठा आरक्षणाला आव्हान; याचिकाकर्त्यांना धमक्या


मुंबई (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण कायद्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्याच्या तयारीत असलेले अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते आणि अ‍ॅड. जयश्री पाटील यांना अनेक अज्ञात व्यक्तींकडून धमक्यांचे फोन येत आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली आहे. 

सरकारी नोकर्‍या व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने केला; पण या कायद्याला अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते आणि अ‍ॅड. जयश्री पाटील हे उद्या याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे आता त्यांना निनावी धमक्यांचे फोन येत आहेत. काल दुपारी 4 वाजेपासून आम्हाला सतत धमक्यांचे फोन येत आहेत. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर नगर आणि भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे सदावर्ते यांनी सांगितले. तक्रारीनंतर त्यांच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने 1992मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार एकूण 50 टक्क्यांपुढे आरक्षण देण्यावर निर्बंध आहेत. त्याचे उल्लंघन करून राजस्थानमध्ये गेल्या वर्षी राज्य सरकारने विशिष्ट समाजाला आरक्षण दिले असता त्याला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. राजस्थान उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयांचे निवाडे लक्षात घेऊन राज्य सरकारच्या आरक्षण कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले असता, सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाने 13 नोव्हेंबर 2017 रोजी अंतरिम आदेश देताना राज्य सरकारला 50 टक्क्यांच्या मर्यादेपुढे कोणत्याही समाजाला आरक्षणाचे लाभ देण्यास स्पष्ट मनाई केली. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन 50 टक्के मर्यादेच्या पुढे जाऊन महाराष्ट्रातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाकरिता 16 टक्के आरक्षण देण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या विधेयकाला मंजुरी देऊ नये आणि त्याला स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारे पत्र ’इंडियन कॉन्स्टुट्युशनलिस्ट कौन्सिल’च्या सदस्य डॉ. जयश्री पाटील यांनी अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांनी राज्यपालांना पाठवले होते; मात्र राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी करून त्याला मंजुरी दिल्याने मराठा आरक्षणाला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता या कायद्याला उद्या उच्च न्यायालयात याचिका करून आव्हान देणार असल्याचे अ‍ॅड. सदावर्ते यांनी शुक्रवारी सांगितले होते.