Breaking News

कृष्णेचे सत्ताधारी आणताहेत जयवंत शुगरला बाळसं : डॉ. मोहितेकराड,  (प्रतिनिधी) : पारदर्शी कारभाराची स्वप्ने दाखवून कृष्णा कारखान्यावर निवडून आलेल्या सत्ताधार्‍यांनी अंदाधूंद कारभार सुुरु केला आहे. कारखान्याचे निर्णय खासगी ट्रस्टवर घेतले जातात. कृष्णेच्या सत्तेचा उपयोग करुन जयवंत शुगरला बाळसं आणण्याचा प्रयत्न अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले करीत आहेत, असा आरोप कृष्णेचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. असाच कारभार सुरू राहिला तर लवकरच कृष्णा कारखाना भोसलेंची प्रायव्हेट लिमीटेड कंपनी होईल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या सत्तेवर येताना विद्यमान सत्ताधार्‍यांनी पारदर्शी कारभार करु, कृष्णेला गतवैभव प्राप्त करुन देऊ अशी गोडगोड स्वप्ने सभासदांना दाखवली होती. मात्र सत्तेवर आल्यावर त्यांनी कराड दक्षिण व उत्तरमधील बहुतांशी सभासदांच्या ऊस नोंदीमध्ये फरक करुन जाणिवपुर्वक ऊसतोड उशिरा देणे, अडचणी आणणे असला उद्योग सुरु केला आहे. चांगला ऊस जयवंत शुगरला पाठवण्याचा खासगीत सल्ला दिला जातो. व कृष्णेच्या जीवावर जयवंत शुगर मोठा करण्याचा उद्योग सुरु आहे.

सन 2015 पासून आजअखेर मृत सभासदांचे शेअर्स ट्रान्सफर करण्याची प्रक्रीया जाणिवपूर्वक थांबवली आहे. शेअर्स ट्रान्सफर अर्ज देण्यासाठी गेलेल्या सभासदांना अजून धोरणात्मक निर्णय झाला नाही, संचालक बोर्डाचा आदेश नाही, या बाबतची कागदपत्रे दाखल करायची असल्यास कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टवर जावा, असा सल्ला देऊन टोलवाटोलवी केली जाते. विद्यमान संचालक मंडळाला यात राजकारण करायचे आहे. त्यामूळे संबंधीत शेअर्स धारकांनी मृत सभासद शेअर ट्रान्सफर करण्यासाठी एक लेखी अर्ज, वारसाच्या नावाचा चालू तारखेचा सातबारा खातेउतारा, वारस नोंदीचा किंवा अन्य वारस नसल्याचा तलाठ्यांचा दाखला, तहसीलदारांचा वारस दाखला, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर शेअरवर्ग होणार आहे. 

त्याचे प्रतिज्ञापत्र, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर वारसांचे संमतीपत्र, सोसायटीचा येणे - देणेबाकीचा दाखला, मृत्यु नोंद, इरिगेशन येणेबाकी दाखला, प्रवेश फी व शेअर ट्रान्सफर अर्ज, शेअर सर्टीफीकेट अगर त्याचा दाखला मिळण्यासाठीचा अर्ज ही कागदपत्रे 31 डिसेंबरच्या आत रजिस्टर पोस्टाने कारखान्याचे अध्यक्ष व एमडींच्या नावे पाठवावीत. संबंधीत अर्जांची झेरॉक्स व कागदपत्रांची झेरॉक्स स्वतःजवळ ठेवावी. त्यानंतरही निर्णय झाला नाही तर त्यांनी ही कागदपत्रे आमच्याकडे द्यावी आम्ही मृत सभासद शेअर ट्रान्सफर साठी प्रयत्न करु, असेही डॉ. मोहिते यांनी या वेळी सांगितले.