Breaking News

मुख्यमंत्र्यांची विखे यांना नोटीस एक लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबई/ प्रतिनिधीः
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांना नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वीच विखे यांनी मुंबईच्या विकास आराखड्यात मुख्यमंत्र्यांवर एक लाख कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विखे यांना बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

मुंबईच्या विकास आराखड्या(डीपी 2014-34)त बदल करून मुख्यमंत्र्यांनी एक लाख कोटी रुपये लुबाडले आहेत. मोठ्या बिल्डरांना फायदा पोहोचवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी या विकास आराखड्यात बदल केला आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि बिल्डर यांच्यामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा सौदा झाला आहे. त्यातील 5 हजार कोटी रुपयांची रक्कम आधीच मुख्यमंत्री कार्यालयाला पोच झाली. मुख्यमंत्र्यांनी बिल्डरांच्या हितासाठीच विकास आराखड्यात बदल केला. तसेच बदललेला मुंबईचा विकास आराखडा पूर्वीसारखाच करावा. अन्यथा, न्यायालयात जाऊ, असा इशाराही विखे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे-पाटील बिनबुडाचे आरोप करत असल्याचे सांगत त्यांना बदनामीची नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणेच आज विखे-पाटलांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
पहिल्यांदा दोन इमारतींमध्ये फायर ब्रिगेडची वाहने जाण्यासाठी 9 मीटरचा रस्ता मोकळा सोडणे अनिवार्य होते. आता त्यात बदल करून 6 मीटर करण्यात आले आहे. एवढ्या कमी जागेतून फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी कशा पोहोचू शकणार आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास योजने(एसआरए)त 4 एफएसआय दिला जात होता; परंतु बिल्डरांच्या फायदा पोहोचवण्यासाठी त्या एफएसआयमध्येही वाढ करण्यात आल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटलांनी केला होता