Breaking News

शिवकन्या राणूबाईसाहेब यांच्या समाधीबाबतची संदिग्धता संपवा


सातारा
शिवकन्या राणूबाईसाहेब जाधवराव यांची संभाव्य समाधी असलेल्या जागी भुईंज येथे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र मौखिक व परंपरास्वरुपात मिळत असलेल्या माहितीवरुन येथे राणूबाईसाहेब यांची समाधी असल्याचे आढळून येत आहे. भुईंज ग्रामपंचायतीने येत्या 15 दिवसात याबाबतचा खरा इतिहास समोर आणून समाधीबाबतची संदिग्धता संपवावी अन्यथा दि. 18 रोजी भारतीय रक्षक आघाडीचे कार्यकर्ते कृष्णा नदीपात्रात जलठिय्या आंदोलन करतील असा इशारा आघाडीचे अध्यक्ष अरबाज शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी भारतीय रक्षक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, प्रदेश सचिव व माजी नगरसेवक अमर गायकवाड, सचिन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युगनिर्माते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या द्वितीय कन्या राणूबाईसाहेब जाधवराव यांची समाधी (वृंदावन) भुईंज येथे असल्याचे समजते. मात्र, याच जागेवर एकाने इमारत बांधली आहे. ही समाधी आमच्या राणूबाईसाहेब यांची असावी असे मत भैय्यासाहेब जाधवराव यांनी व्यक्त केले आहे. तसेच या जागेच्या ग्रामपंचायतीकडे असलेल्या 8 अ उतार्‍याच्या रजिस्टवरील 879 क्रमांकासमोर घुमटाचा लहान चबुतरा असा उल्लेख आहे.या चबुतर्‍यावर एक तुळशी वृंदावन होते असे येथील जाणकार लोक सांगतात. तसेच याच परिसरात जाधवराव घराण्यातील रायाजीराव व कमळाबाई यांची समाधी असलेली जुनी दगडी इमारत आहे.हा परिसर पूर्वी जाधवराव घराण्याचा अग्नीकट्टा म्हणजे अंत्यसंस्कार करण्याची जागा होती असेही सांगितले जाते. दरम्यान, जाधवराव यांच्या वंशावळीमध्ये केवळ पुरुषांच्याच नावाचा उल्लेख असल्याने राणूबाईसाहेब यांचा नामोल्लेख आढळत नाही. मात्र, राणूबाई नावाची शिवाजी महाराजांची कन्या मावळातील जाधव घराण्यात दिल्याची नोंद आहे. (मावळ प्रांत हा जुन्नर पासून वाईपर्यंत येत होता) या पट्टयात भुईंजचे जाधवरावांचे घराणे जिजाऊ आईसाहेबांच्या माहेरचे घराणे आहे. याशिवाय शिवाजी महाराजांची काशीबाई नावाची एक पत्नीही जाधव घराण्यातील असल्याची नोंद इतिहासात आहे. 

सध्या झीटीव्हीवर सुरु असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजीमहाराज या मालिकेचे लेखन करताना ज्या डॉ. कमल गोखले यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे. त्या पुस्तकाच्या पान नं. 42 वर राणूबाई जाधवांकडे दिली होती, असा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच या समाधीच्या ठिकाणी जाण्यासाठी जाधवराव यांच्या सध्याच्या वाड्यातून एक भुयारही होते. ही स्त्री जर साधारण घराण्यातील असती तर तिच्या समाधीपर्यंत जाण्यासाठी भुयार खोदण्याची आवश्यकता नव्हती, तसेच येथील संभाव्य समाधीच्या जागी इमारत बांधताना काढलेल्या दगडांवरील शिल्पांचा अभ्यास केला असता अशी शिल्पे केवळ सरदार घराण्यातील स्त्रीपुरुषांच्याच समाधीवर असल्याचे इतिहासकार सांगतात. याठिकाणी बांधलेल्या इमारतीच्या शेजारीच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या कंपाऊंडमध्ये याच समाधीवरील दगड वापरल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, याबाबतची जुनी कागदपत्रे सध्या जाधवराव यांच्याकडे नाहीत कारण ती बाबासाहेब पुरंदरे यांनी अभ्यासासाठी म्हणून नेली आहेत. ती अद्याप परत मिळालेली नाहीत. या मोडी लिपीतील कागदपत्रात ही समाधी नेमकी कोणाची आहे याबाबतची माहिती मिळू शकते. याबाबतच ज्येष्ठ शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांनी सांगितले की, जाधवराव घराण्याची आणखी कागदपत्रे मंगसुळी गावातील हेळवी समाजाकडे असण्याची शक्यता आहे. याठिकाणीही शोध घेतल्यास याबाबतची संदिग्धता संपू शकते. याठिकाणी असलेली समाधी राणूबाईसाहेब यांचीच असल्याचे पुरावे जरी मिळत नसले तरी मौखीक परंपरा आणि इतिहासातील काही नोंदीच्या आधारे राणूबाईसाहेब यांचीच ही समाधी असण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने येत्या 15 दिवसात या समाधीबाबतची संदिग्धता संपवावी अन्यथा भारतीय रक्षक आघाडीचे कार्यकर्ते कृष्णा नदीपात्रात जलठिय्या आंदोलन करतील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. 

यावेळी भारतीय रक्षक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, राणूबाईसाहेब ही आमची अस्मिता आहे. ज्या शौर्याने आणि धैर्याने त्यांनी आपल्या भावाला म्हणजेच छत्रपती संभाजीराजांना साथ दिली त्यावरुन अशी बहिण प्रत्येकाला असावी असे वाटत आहे. याबाबत भुईंज ग्रामपंचायतीने योग्य ते पुरावे सादर करावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.