Breaking News

भावठाण आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ.केंद्रेंसह कंपाऊंडर चोटपगार लाचलुचपतच्या जाळ्यातबीड, (प्रतिनिधी):- अंबाजोगाई तालुक्यातील भावठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महादेव केंद्रे आणि तेथीलच कंपाऊंडर प्रशांत चोटपगार हे दोघे २५ हजार रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी आज दुपारी भावठाण येथे कारवाई करुन कंपाऊंडर चोटपगार यास तेथीलच शिपायाकडून २५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान महसूल, पोलिस, वन विभाग या प्रमाणेच आता आरोग्य विभागातही लाचेची लागन झाली असुन एसीबीने दोघांना कारवाईचे इंजेक्शन दिल्याने खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील भावठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत शिपायाने दोन महिन्याचे वेतन आणि जीपीएफच्या चेकची मागणी केली होती. तेथील वैद्यकीय अधिकारी महादेव पांडुरंग केंद्रे यांनी वेतन आणि चेक देण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी कंपाऊंडर  प्रशांत बापुराव चोटपगार यांच्यामार्फत केली होती. यासंदर्भात सदरील शिपायाने दि.६ डिसेंबर २०१८ रोजी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक बाळकृष्ण हणपुडे पाटील, पोहेकॉ.दादासाहेब केदार, विकास मुंडे, अमोल बागलाने, मनोज गदळे, सय्यद नदीम यांनी आज दुपारी भावठाण येथे सापळा लावला. यावेळी तक्रारकर्त्या शिपायाकडून २५ हजार रुपयांची लाच घेतांना प्रशांत चोटपगार यास रंगेहाथ पकडले.