Breaking News

कराड अर्बन बँकेच्या प्रशिक्षण केंद्राच्या बँकिंग कोर्ससाठी प्रवेश घ्या : देशपांडे
कराड,
कराड अर्बन बँकेच्या विद्यानगर, कराड येथील सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या वतीने सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कोणत्याही शाखेच्या पदवीधर असणार्‍या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश दिला जाणार असून काही मोजक्याच जागा शिल्लक असल्याने प्रवेशासाठी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे प्राचार्य दिलीप देशपांडे यांनी केले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमासंबंधी अधिक माहिती देताना देशपांडे पुढे म्हणाले की, सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्र, विद्यानगर, कराड येथे सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग या कोर्सच्या 27 व्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून हा कोर्स 3 डिसेंबर 2018 रोजी विद्यानगर कराड येथे प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये सुरू होत आहे. या कोर्ससाठी जागा मर्यादित असून कोणत्याही शाखेच्या पदवीधरास या कोर्सला प्रवेश दिला जाईल. दोन महिने प्रशिक्षण केंद्र येथे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिल्यानंतर विद्यार्थ्यांना दहा महिने नजिकच्या शाखेत प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी पाठविले जाते.

यावेळी पुढे बोलताना दिलीप देशपांडे म्हणाले की, कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी यांच्या प्रेरणेतून व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे काम चांगल्या प्रकारे चालले असून त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना आजवर झाला आहे. तसेच हा कोर्स पुर्ण करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी नोकर्‍या मिळाल्या आहेत.