Breaking News

सर्व साधारण विजेतेपद पुरूष गटात अकोला तर महिला गटात बुलडाणा जिल्ह्याला अमरावती परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण


 बुलडाणा,(प्रतिनिधी): येथे संपन्न झालेल्या अमरावती परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे पुरूष गटाचे सर्वसाधारण विजेते पद अकोला जिल्ह्याने तर महिला गटाचे सर्व साधारण विजेते पद बुलडाणा जिल्ह्याने प्राप्त केले आहे. तर उत्कृष्ट मैदानी खेळाचा मान अकोल्याचे सहाय्यक  पोलिस उपनिरीक्षक सागर देशमुख यांना बहाल करण्यात आले. अमरावती परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी डॉ.निरूपमा डांगे, आंतरराष्ट्रीय खेळाडू शारदा शिंदे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अमरावती पोलिस आयुक्त संजयकुमार बावीस्कर, पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, राकेश कलासागर, दिलीप झळके यांची उपस्थिती होती.

अमरावती परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत पुरूषामध्ये प्रथम  क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद 152 गुण अकोला जिल्ह्याने प्राप्त केले. तर 131 गुणांसह अमरावती शहर द्वितीय क्रमांकावर राहिले. तर 75 गुण प्राप्त करून बुलढाणा जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिला. महिला मध्ये प्रथम क्रमांकाचे सर्वसाधारण विजेते पद 119 गुण घेऊन बुलडाणा जिल्ह्याने प्राप्त केले. तर 82 गुणांसह यवतमाळ जिल्हा द्वितीय तर 45 गुणांसह अकोला जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिला.  पुरूषांमध्ये सर्वोकृष्ट खेळाडू बहुमान अकोल्याच्या सागर देशमुख  तर महिलांमध्ये यवतमाळच्या पोलिस कॉन्स्टेबल  वनिता पवार यांना मिळाला. सांघीक क्रिडा प्रकारात  हॅडबॉल खेळात पुरूषांमध्ये प्रथम क्रमांक बुलढाणा तर द्वितीय क्रमांक अकोला जिल्ह्याने प्राप्त केला. बॉस्केटबॉल मध्ये प्रथम क्रमांक अकोला तर द्वितीय क्रमांक अमरावती ग्रामीणने मिळविला. हॉकीमध्ये अमरावती शहर प्रथम तर अकोला द्वितीय स्थानावर राहिला. खो खो मध्ये अकोला प्रथम तर अमरावती ग्रामीण द्वितीय स्थानावर राहिला. व्हॉलीबॉल मध्ये यवतमाळ प्रथम तर अमरावती शहर द्वितीय स्थानावर राहिला. कबड्डीत महिलामध्ये यवतमाळ संघ प्रथम तर अकोला द्वितीय, व्हॉलीबॉल मध्ये यवतमाळ प्रथम तर अमरावती शहर द्वितीय, बॉस्केटबॉल मध्ये अमरावती शहर प्रथम तर यवतमाळ द्वितीय, खो खो मध्ये बुलढाणा प्रथम तर अकोला द्वितीय स्थानावर राहिला. हे सर्व विजयी खेळाडू नागपूर येथे होणार्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेत अमरावती परिक्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पोलिस हे जनतेची सेवा करीत असतांना जनतेमध्ये राहुन काम करीत असतात. तसेच जनतेमध्ये एकोपा निर्माण करण्याचे काम हा एकोपा पोलिसामध्ये सांघीक खेळाने निर्माण होतो. पोलिसांसाठी क्रीडा स्पर्धा हा विजयाचा उत्सव असतो. राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती परिक्षेत्राने 20 पारितोषिके प्राप्त करावी अशी अपेक्षा पोलिस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी  व्यक्त केले. तर मनुष्याचे व्यक्तीमत्व घडविण्याचे काम हे क्रीडा क्षेत्र करीत असते. स्पर्धे निमित्त होणार्या खेळामधून मिळणार्या स्फुर्तीमुळे व्यक्तीमत्व विकसित होत असते. अत्यंत आनंददायी वातावरणात या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या पोलिस खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजय संपादन करावा असे जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी सांगितले.