Breaking News

गुजरात मधून नाशिकमध्ये गुटख्याची राजरोस तस्करी


प्रशांत हिरे / सुरगाणा
राज्य शासनाने राज्यामध्ये गुटखाबंदी करून काही वषार्र्ंचा कालावधी झाला असला, तरी याचाच फायदा करून घेत काही गुटखा तस्करांनी आपले नेटवर्क तयार केले आहे. होलसेलपासून रिटेलपर्यंत थेट जाग्यावर गुटखा पोहोच देण्याची स्वतंत्र व्यवस्था केल्याने राज्य शासनाच्या गुटखाबंदीचा फज्जाच उडाला आहे.गुजरातमधून गुटखा आणून तो थेट महाराष्ट्रातील पानपट्ट्यांमध्ये पोहोचवणारी स्वतंत्र टोळी कार्यरत झाल्याने यातील लागेबांधे फारच वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे या गुटखा तस्करांकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने मोठ्या थाटामाटात गुटखाबंदी केली असली, तरी ती प्रत्यक्ष कागदावरच झाली आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, आजही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरूच आहे.

दिंडोरी तालुकाही याला अपवाद नसून, नाशिक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये तर गुटखाबंदीचा पूर्ण फज्जा उडाला आहे. शहरामध्ये गुटख्याची गुजरातमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे गुटखाबंदी केवळ कागदावरच झाली असून, ती प्रत्यक्षात कधी उतरणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी पानपट्ट्यांमध्ये हव्या असलेल्या सर्वप्रकारच्या गुटख्याच्या पुड्या मिळत असून, त्याचा भावही आता चढ्या दरामध्ये आहे. काही ठराविक ग्राहकांना ओळखूनच या गुटख्याची विक्री होत आहे.गुजरातमधून या पानपट्टीचालकांना गुटख्याची देवाण-घेवाण करणारी टोळी कार्यरत असून, यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जात आहे.