Breaking News

राम मंदिरासाठी वायदा नको, कायदा हवा-गायकर यांची भाजपवर टीका


पुणे (प्रतिनिधी)- अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून विश्‍व हिंदू परिषदेकडून लढा आणि आंदोलने करण्या आली. अजूनही राम मंदिराची निर्मिती झालेली नाही. आता आम्ही काय जागतिक संघटनेकडे राम मंदिराच्या निर्मितीची मागणी करायची का, असा खोचक प्रश्‍न विश्‍व हिंदू परिषदेने उपस्थित केला आहे. विश्‍व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर टीका करताना हिंदूंना राम मंदिरासाठी वायदा नको कायदा हवा, असे म्हटले आहे.

या वेळी गायकर म्हणाले, की न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त जागेचे उत्खनन करण्यात आले आणि त्यामध्ये मंदिराचे अवशेष सापडले आहेत. न्यायालयाने हे मान्य केले आहे, की त्या जागी मंदिर होते आणि हीच प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये या प्रकरणाचा अंतिम निर्णय येण्याची शक्यता असताना पुन्हा पुढची तारीख देण्यात आली. आजवरचा घटना क्रम पाहता तारीख पे तारीख असे अजून किती वर्षे चालणार आहे, असा सवाल त्यांनी केला. न्यायालय आणि भाजपवर त्यांच्या टीकेचा रोख होता. 

देशभरात धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असून पुण्यात विराट धर्मसभेचे 9 डिसेंबरला धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत कागशिला पिठाधिश्‍वर महंत साध्वी प्रज्ञा भारतीय, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकूमचंद सावला हे उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. सरकारने राम मंदिरासाठी कायदा न केल्यास देशभरात त्याचे पडसाद उमटणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. विश्‍व हिंदू परिषदेने आता देशभर धर्मसभा घेऊन भाजप सरकारवर कायदा करण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली आहे. धर्मसभा आता सरकारला अल्टिमेटम देत आहेत. राम मंदिराचा मुद्दा सध्या देशभरात गाजतो आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश काढावा, अशी मागणी शिवसेनेनेही केली आहे. भाजपकडून फक्त राम मंदिराचे राजकारण केले जात आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. अशात आता विहिंपने राम मंदिरासाठी आम्ही जागतिक संस्थांची मदत घ्यायची का असा खोचक सवाल विचारत भाजावर निशाणा साधला आहे.