Breaking News

दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचा समारोपसातारा, (प्रतिनिधी) : येथे 30 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या 20 व्या अधिवेशनाचा व 9 व्या दैवज्ञ साहित्य संमेलनाचे खुल्या अधिवेशनाने रविवारी समारोप करण्यात आला.

रविवारी पहिल्या सत्रात संत साहित्याचा महिमा, कवितेतील स्त्री विश्‍व, प्रेरणादायी आत्मचरित्र, नाट्य आणि साहित्य, पत्रकारिता आणि साहित्य या विषयावर विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माधव बांदिवडेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी सीमा ओवळेकर होत्या. तर दीपक जव्हेरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन दीपक भुर्के व प्रा. श्याम भुर्के यांनी केले.

दुपारच्या सत्रात ग्रंथहंडी, साहित्यातील महिलांचे योगदान, साहित्यातील विनोदाचे स्थान, सुवर्णकारिका आणि साहित्य, विनायकराव देवरुखकरांचे साहित्य याविषयावर विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. या सत्राचे उद्घाटन सौ. अरुणा गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले तर विद्याधर साळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन वैशाली नारकर यांनी केले. यावेळी दैवज्ञ साहित्य मंच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

भोजनानंतर खुल्या अधिवेशनाला प्रारंभ झाला. यामध्ये नियामक समितीकडून आलेल्या ठरावाचे वाचन व त्यावर आनंद जगन्नाथ पेडणेकर, दिनकर बायकरीकर, प्रमोद बेनकर यांच्यासह सदस्य व सहभागी समाज बांधवांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाने गेली चार दिवस सुरु असलेल्या दैवज्ञ समाजोन्नति परिषदेचा समारोप करण्यात आला.