Breaking News

प्रतापगडावर शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी


सातारा (प्रतिनिधी) : ढोल ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुतार्‍यांचा रोमांच उभा करणारा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यावर होणारी पुष्पवृष्टी तसेच शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. आज पहाटे पासूनच या मंगलमय वातावरणाने आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीने हा परिसर भारावून गेला होता. 

आज सकाळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आयकर विभागाचे सह संचालक कोल्हापूर परिक्षेत्र पुर्णेश गुरुरानी तसेच अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पुजा बांधण्यात आली. भवानी मातेचे पुराणिक नरहर हडप (गुरुजी) आणि विजय हवालदार यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली. भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणार्‍या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुतार्‍या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, वाईचे तहसिलदार रमेश शेंडगे, महाबळेश्‍वरचे तहसिलदार मिनल कळसकर, महाबळेश्‍वरचे नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे, पंचायत समिती सभापती रुपाली राजपूरे, मुख्याधिकारी अमिता दगडे आदी उपस्थित होते. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुतार्‍या, स्वराज्य मराठा ढोल ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणार्‍या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला. पालखीचे शिवरायांच्या अश्‍वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी भगव्याचे ध्वजारोहण केले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. यानंतर शाहीर प्रभाकर आसनगावकर आणि सहकार्‍यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच कोल्हापूरचे अध्यक्ष सुरज ढोली यांनी विद्यार्थ्यांसह लाठी चालवणे, तलवारजबाजी, दांडपट्टा, कुर्‍हाडबाजी आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिके करुन उपस्थितांची मने जिंकली. या नेत्रदीपक सोहळ्यास विविध शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.