Breaking News

नगर तालुक्यातील रस्ते दुरुस्ती करण्याची मनसेची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी)- अपघाताला कारणीभुत ठरणारे नगर तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी व रेल्वे गेट येथे उड्डणपुल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा.अधिक्षक अभियंता पी.डी. कोतकर यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे नगर तालुका प्रमुख बाळासाहेब ढवळे, संकेत सोमवंशी, राकेश पाटील, सागरसिंह तावरे, सचिन निमसे, रामनाथ डुकरे, भाऊसाहेब ठोकळ, काशीनाथ चोथे, महादेव इंगळे, अमोल सांगळे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.


निंबळक, इसळक, खारेकर्जुने निमगाव घाणा, भाळवणी येथील रस्ते उखडल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहतुक करावी लागत आहे. तर पाईपलाईनसाठी अनेक ग्रामस्थांनी रस्त्यावर चर खोदली असून, ही चर व्यवस्थितपणे बुजविण्यात आलेली नाही. यामुळे सदरील रस्त्यांवर अनेक लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.


तसेच रेल्वे गेटच्या ठिकाणी नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उड्डाणपुल किंवा भुयारी मार्ग होणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या फाटकावर वर्षाकाठी 50 लाखा पेक्षा अधिक खर्च येतो. उड्डणपुल किंवा भुयारी मार्ग झाल्यास हा खर्च वाचून नागरिकांची सोय होणार आहे. यासाठी सारोळा कासार, अरणगाव, निंबळक, विळद, देहरे, शिंगवे नाईक या ठिकाणी रेल्वे गेट जवळ उड्डणपुल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.