Breaking News

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाची खासदाराच्या कार्यालयावर धडक


 बुलडाणा,(प्रतिनिधी): दिव्यांगांंच्या समस्या निवारणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समन्वय समिती गठीत करण्यात यावी, लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतील अपंगांचा राखीव निधी अपंगांवरच खर्च करण्यात यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांना अपंगांच्या हक्काचा 5 टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश देण्यात यावे, संगणकीय अपंग प्रमाणपत्र देण्यात यावे, अपंग बीज भांडवल योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, अपंगांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, यासह इतर मागण्यासाठी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 3 डिसेंबर रोजी खा. प्रतापराव जाधव यांच्या बुलडाणा येथील संपर्क कार्यालयावर धडक दिली.

 या आंदोलनात जिल्हाभरातील अपंग बांधव सहभागी झाले होते. यावेळी अपंगांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी केली. चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. ग्राहक सेवा केंद्राकडून अपंगांची होणारी हेळसांड थांबवावी, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये झिरो बॅलेन्सवर खाते सुरु ठेवण्यात यावे, राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंगांचे सिट आरक्षित ठेवण्यात यावे, व्यापारी गाळ्यांमध्ये 3 टक्के आरक्षण देण्यात यावे, अपंगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात यावे, 14 वित्त आयोगातील अपंगांच्या राखीव निधीचा अनुशेष भरून काढण्यात यावा, शासकीय कार्यालयात होणारी हेळसांड थांबविण्यात यावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने खा. प्रतापराव जाधव यांच्याकडे करण्यात आली होती. 

मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने प्रहार अपंग क्रांतीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाप्रमुख शिवनारायण पोफळकर, महिला जिल्हाप्रमुख जयश्री गिते, जिल्हा संघटक सुनील वराडे, राजेश पुरी, सुरेश जवंजाळ, भगवान लेनेकर, शिवा डवले, दिनेश गावंडे, अभिलाष क्षीरसागर, श्रीराम सुरोशे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज 3 डिसेंबर रोजी खा. प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी खासदार जाधव यांच्या स्वियसहाय्यकांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

 मात्र, आंदोलकांनी समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिंधींची संयुक्त बैठक लावण्याचे लेखी पत्र दिल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. दरम्यान, वाशीम दौर्‍यावर असलेल्या खा. प्रतापराव जाधव यांनी शिवसेना नेते संजय गायकवाड यांच्यामार्फत बैठक लावण्याची लेखी हमी दिल्याने आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.