Breaking News

मोदींच्या कार्यक्रमाला उत्तर भारतीयांचा विरोध; काळे झेंडे दाखविण्याचा इशारा; भाजप मात्र करणार शक्तिप्रदर्शन


कल्याण (प्रतिनिधी)ः कल्याण शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 18) विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. मोदी यांच्या दौर्‍यानिमित्त महापालिका प्रशासनाने शहर चकाचक केले असून कल्याणच्या जनतेला ’अच्छे दिन’चा अनुभव येत आहे. दरम्यान, उत्तर भारतीय महापंचायतीने मात्र मोदी यांच्या दौर्‍याला विरोध दर्शवला असून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे.

कासार वडवली-भिवंडी-कल्याण या मेट्रो टप्पा क्रमांक 5 तसेच पंतप्रधान आवास योजनेतील 90 हजार घरांच्या भूमिपूजनाचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानात मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. फडके मैदानाच्या जवळच कल्याण-डोंबिवली महापालिकेचा आधारवाडी कचरा डेपो आहे. कचरा डेपोतून दुर्गंधी येऊ नये, म्हणून महापालिकेकडून रसायनांची फवारणी करण्यात येत आहे. डेपोला आग लागू नये, यासाठी 24 तास 30 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मोदी यांचे आगमन होत असलेले हेलिपॅड ते सभास्थळ या मार्गावरील सुमारे 150 अतिक्रमणे रविवारी कल्याण महापालिकेने जमीनदोस्त केली. 50 फूट रस्ता सोडून अधिकृत असलेल्या टपर्‍या नोटीस न देता पाडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पंतप्रधानांचा ताफा येणार्‍या मार्गावरील गतिरोधक हटवण्यासाठी रविवारी 10 जेसीबी कार्यरत होते. सभेला भाजपचे 50 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.

दरम्यान, मोदी यांच्या दौर्‍याला विरोध करुन त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देणारे उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांना दादरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. दुबे यांनी मागच्या महिन्यात मुंबईत उत्तर भारतीय महापंचायतीचे आयोजन केले होते. त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात राज यांनी आपल्या पक्षाची उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका स्पष्ट केली होती. मुंबईत परप्रांतीय लोकांचे लोंढे वाढत असल्याने मराठी लोकांचा रोजगार हिरावला जात आहे. त्यामुळे आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागते. तुमच्या भागातील नेते (उत्तर भारतीय) त्या राज्यात रोजगार उपलब्ध करुन देत नसल्याने तुम्हाला स्थलांतर करण्याची वेळ येते. त्यामुळे तेथील विकासासंदर्भात तुम्ही (उत्तर भारतीय) तुमच्या नेत्यांना जाब का विचारत नाही?, असा सवाल राज यांनी केला होता. राज यांची ही भूमिका पटल्यानंतर उत्तर भारतीय महापंचायतीने यापुढे उत्तर भारतातून निवडून आलेल्या नेत्यांना मुंबईत प्रचारासाठी येऊ देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर आता महापंचायतीने पंतप्रधानांना कल्याण दौर्‍यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येऊनही त्यांनी तेथील विकास केला नाही, असा महापंचायतीचा आरोप आहे

शिवसेनेचा बहिष्कार? 

पंतप्रधान मोदी यांच्या कल्याण येथील कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपने निमंत्रित केलेले नाही. त्यामुळे शिवसेना या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी युतीतील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. कोस्टल रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाला शिवसेनेने ही मुख्यमंत्र्यांना बोलविलेले नाही. पुण्याच्या मोदी यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मोदी यांना नाही.