Breaking News

सिरसमार्ग निम्न पातळी बंधा-याच्या वरील बाजूस सिंदफणा, डोमरी आणि इद्रुपा या नद्यांचे खोलीकरण करा- रामहरी मोरे


बीड (प्रतिनिधी)- गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे सिंदफणा नदीवर निम्न पातळी बंधारा आहे. बंधा-याचा पाणीसाठा म्हणजेच सिंदफणा, डोमरी आणि इद्रुपा या नदीपात्रातील पाणीसाठा होय. मात्र बंधारा झाल्यापासून अद्याप या नद्यांचे खोलीकरण झालेले नाही. म्हणून बंधा-याच्या क्षमतेएवढा पाणीसाठा होण्यासाठी बंधा-याच्या वरील बाजूस सिंदफणा, डोमरी आणि इद्रुपा या तीनही नद्यांचे खोलीकरण करा अशी मागणी भारतीय कमुनिस्ट पक्षाच्या वतीने ए आय एस एफचे जिल्हाध्यक्ष रामहरी मोरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे केली आहे. 

सविस्तर वृत्त असे की, गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे जायकवाडी प्रकल्प टप्पा क्र. २ अंतर्गत सिरसमार्ग निम्न पातळी बंधारा, ता. गेवराई, जि. बीड हे काम सिंदफणा नदीवर झालेले आहे. ३९३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन २.०६३ द. ल. घ. मी. इतका एकूण पाणीसाठा होईल असा हा बंधारा आहे. बंधा-याच्या वरील बाजूस सिंदफणा आणि डोमरी या दोन मोठे नदीपात्र असणा-या आणि इद्रुपा ही लहान नदी आहे. बंधा-याच्या वरील बाजूस काही अंतरावरच या तीनही नद्या एकमेकांना मिळतात. बंधा-यातील पाणीसाठा म्हणजेच या तीन नदीपात्रातील पाणीसाठा होय. मात्र बंधारा झाल्यापासून अद्याप या तीनही नद्यांचे खोलीकरण झालेले नाही. तसेच वाहून आलेली वाळू आणि माती या नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात साचलेली आहे. परिणामी नद्यांचे पात्र उथळ झाल्यामुळे पूरस्थितीत आजूबाजूच्या शेतात पाणी जाऊन शेतक-यांचे नुकसान होत आहे. तसेच उथळ नदीपात्रामुळे बंधा-याची पाणी साठवण क्षमता देखील कमी झाली आहे. यामुळे परिसरातील आठ ते दहा गावांना होणार लाभ काही कालावधीपुरताच मर्यादित असतो. 

डोमरी आणि इद्रुपा या दोन नदीपात्राचे खोलीकरण अनुक्रमे पारगाव(सिरस) आणि दिमाखवाडी या गावांपर्यंत उगमस्थानाकडील दिशेने झालेले आहे. मात्र पारगाव(सिरस) पासून सिंदफणा नदीपर्यंत साधारण ४ ते ५ कि. मी. अंतराचे डोमरी या नदीचे खोलीकरण झालेले नाही. तसेच दिमाखवाडी या गावापासून सिंदफणा नदीपर्यंत साधारण ४ कि. मी. अंतराचे इद्रुपा या नदीचे खोलीकरण झालेले नाही. सिंदफणा नदीचे खोलीकरण देखील झालेले नाही. या तीनही नदीपात्रांचे खोलीकरण झाल्यास बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेएवढा पाणीसाठा होऊन परिसरातील गावांना दीर्घकालीन लाभ होऊ शकतो. ही सर्व परिस्थिति लक्षात घेऊन सिरसमार्ग निम्न पातळी बंधा-याच्या वरील बाजूस सिंदफणा नदीचे साक्षाळपिंप्री या गावापर्यंत, डोमरी या नदीचे पारगाव(सिरस) या गावापर्यंत आणि इद्रुपा या नदीचे दिमाखवाडी या गावापर्यंत खोलीकरण करा अशी मागणी भारतीय कमुनिस्ट पक्षाच्या वतीने ए आय एस एफ चे जिल्हाध्यक्ष रामहरी मोरे यांनी निवेदनद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे. निवेदनावर संभाजी आलगुडे, बाबूराव भोईटे, बाळू येवले, दिनेश मोहिते, बाळू आलगुडे, राहुल जायगुडे, अनिल आलगुडे, बाबूराव कदम, गणेश आलगुडे, सुनिल कदम, भागवत आब्दर, अमरजान पठान, प्रवीण गाडे आदींसहीत परिसरातील ग्रामस्थांच्या सह्या देखील आहेत. येता पावसाळा सुरू होण्याआधी खोलीकरण करा अन्यथा भारतीय कमुनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.