Breaking News

सातार्‍यात उद्या ‘राजधानी ऍडव्हेंचर रन’चे आयोजन; तालीम संघ ते किल्ले अजिंक्यतारा मार्गावर धावणार बालचमू


सातारा (प्रतिनिधी) : येथील सजग फौंडेशनच्यावतीने रविवार दि 2 डिसेंबर रोजी केवळ मुलांसाठी राजधानी ऍडव्हेंचर रनचे आयोजन केल्याची माहिती सजग फौंडेशनचे अध्यक्ष प्रशांत मोदी यांनी शुक्रवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती देताना प्रशांत मोदी म्हणाले, तीन वर्षापूर्वी केवळ तीन पालकांनी सुरु केलेली सजग फौडेशनची चळवळ आता 1 हजाराच्यावर सभासदांची झाली आहे. या फौंडेशनचा प्रसार केवळ महाराष्ट्रच नव्हेतर देशभर झाला आहे. याच सजग फौंडेशनच्यावतीने रविवार दि. 2 डिसेंबर रोजी येथील तालीम संघापासून सुरु होणार्‍या या स्पर्धेत दोन गट असतील, त्यापैकी 3 ते 12 वयोगटासाठी 3 किलोमीटर असे स्पर्धेचे अंतर असेल तर 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 6 किलोमीटर अंतर असेल. याच स्पर्धेत 5 अंध आणि 20 दिव्यांग मुलेही सहभागी होणार आहेत. एकूण 550 स्पर्धकांचा या स्पर्धेत सहभाग असणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, किल्ले अजिंक्यतार्‍याच्या खडतर मार्गावर ठिकठिकाणी संस्थेचे स्वयंसेवक, ऍम्ब्युलन्स तसेच पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र तसेच मेडल देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत केवळ सातारा व महाराष्ट्रच नव्हे बाहेरील राज्यातील स्पर्धकही सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा एक्स्पो शनिवार दि.1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 8 यावेळेत येथील हॉटेल ओम एक्झीक्युटीव्ह येथे होणार आहे.
रविवारी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे तर स्पर्धकांनी पहाटे 5.45 ते 6.15 यावेळेत रिपोर्टिंग करावयाचे आहे.

स्पर्धेच्या विजेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी फौंडेशनचे उपाध्यक्ष प्रशांत मोरे, कार्याध्यक्ष नीलेश मोरे, सचिव विलास डिगे, खजिनदार अमित कांबळे, सदस्य संजय चव्हाण, अमोल धुमाळ उपस्थित होते. सातार्‍यात प्रथमच होत असलेल्या राजधानी ऍडव्हेंचर रन या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सातारकरांना उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने यावेळी करण्यात आले.