Breaking News

शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाला शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे : नामदेव जाधव बुलडाणा,(प्रतिनिधी): शेतकरी संघटनेचे 14 वे संयुक्त अधिवेशन 10 ते 12 डिसेंबर दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवसीय अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नामदेवराव जाधव यांनी केले आहे.

 शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी यांनी सुचवलेल्या भारत उत्थान कार्यक्रमावर चर्चा करून शेतीविषयक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ठोस उपाय सुचवणे, शेती आणि शेतकर्‍यांच्या विद्यमान समस्यांवर साधक बाधक चर्चा करून आगामी चळवळीची दिशा या तीन दिवसीय अधिवेशनात निश्‍चित करण्यात येणार आहे. अस्मानी संकट आणि सुलतानी धोरणांच्या मार्‍यात देशातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मलम पट्ट्या करणारे तात्पुरते उपाय यावर सुचवण्यात येतात.

 मात्र शेती आणि शेतकर्‍याला समृद्ध करण्याचा मार्ग केवळ स्व.शरद जोशी यांच्याच विचारात आहे. शेतीतील सरकारी हस्तक्षेप थांबवून घामाला दाम, हाताला काम आणि बाजारपेठेचे स्वातंत्र्य देण्याच्या मागणीसाठी स्व. शरद जोशी यांनी संपूर्ण हयातभर संघर्ष केला. सोप्या आणि सहज भाषेत शेतीचे अर्थशास्त्र मांडून स्व.जोशी यांनी शेतकर्‍याला न्याय देण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत. विद्यमान शेतीतील समस्या सोडवण्यासाठी शरद जोशी यांचेच विचार मार्गदर्शक ठरतात.

 त्यामुळे शरद जोशी यांचा विचार समजून घेऊन कृतिशील उपाय योजण्यासाठी शेतकरी संघटनेने तीन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात शेतकर्‍यांच्या सर्व प्रश्‍नांवर चर्चा करून शेतकर्‍याला त्याचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका मांडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.