Breaking News

भारतासाठी हितकारक विजय


गेल्या सलग दहा वर्षांपासून बांगलादेशात सत्तेवर असलेल्या अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांनी सलग तिसर्‍यांदा मिळविलेला विजय हा त्यांच्या पक्षाच्यादृष्टीने जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच तो भारताच्या दृष्टीने आहे. शेख हसीना यांच्या वडिलांची पूर्व बंगालमध्ये हत्या करण्यात आली. पाकिस्तानने तिथे अराजक निर्माण केले होते. त्या वेळी शेख हसीना घरात नव्हत्या. त्यामुळे त्या वाचल्या. भारताने बांगलादेशाच्या मुक्तीसंग्रामात मोठे योगदान दिले. खलिदा झिया यांच्या काळात भारताशी त्यांचे चांगले संबंध नव्हते. भारतात अतिरेकी घुसवण्यासाठी बांगलादेशाच्या भूमीचा वापर केला जात होता. सीमावर्ती राज्यात कायम अतिरेकी कारवाया सुरू असत. गेल्या दहा वर्षांत शेख हसीना यांच्या काळात बांगलादेशातून अतिरेकी कारवाया झाल्या नाहीत. पाकिस्तानी अतिरेक्यांना तिथे आळा घालण्यात आला. शेख हसीना यांच्या दहा वर्षांच्या राजवटीत बांगलादेशाची चांगलीच प्रगती झाली. काही बाबतीत तर त्या देशाने भारतावर मात केली. कापड निर्यातीत तर त्या देशाने केलेली प्रगती वाखाणण्यासारखी आहे. मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत बांगलादेशाने केलेली प्रगती जगभर कौतुकाचा विषय ठरली. अशा पार्श्‍वभूमीवर बांगलादेशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगने प्रचंड बहुमतांनी विजय मिळवला. विरोधी पक्षनेत्या खलिदा झिया तुरुंगात असल्याने विरोधी पक्षाकडे तसे नेतृत्त्व राहिले नव्हते; परंतु तरीही शेख हसीना यांच्या अवामी लीगला इतक्या जागा मिळतील, असे कोणीच अपेक्षित धरले नव्हते. 2021 मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव आहे. त्यांच्या वडिलांनी बांगलादेशमुक्ती संग्रामात मोठे योगदान दिले. आता सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपण सत्तेत असले पाहिजे, ही जी त्यांची मनोकामना होती, ती तेथील जनतेने पूर्ण केली आहे. भावनात्मक राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला तेथील जनतेने प्राधान्य दिलेले दिसते. रविवारच्या निवडणुकीचा कौल शेख हसीना यांना तिसर्‍यांदा पंतप्रधानप करण्यासाठी आहे. हसीनांच्या अवामी लीगने 350 पैकी 281 जागा जिंकल्या आहेत. गेल्यावेळेच्या तुलनेत अवामी लीगच्या जागांमध्येही वाढ झाली आहे. सर्वांचे अंदाज चुकवून हसीना यांच्या पक्षाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. 

विरोधकांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची संभावना ’फार्स’ म्हणून केली असली, तरी त्याला अर्थ नाही. मागच्या वेळी विरोधकांनी बहिष्कार घातला होता, तर आता निवडणुकीला सामोरे जाण्याचा मार्ग निवडला. 2009पासून पंतप्रधानपदी असलेल्या शेख हसीना यांनी सत्ता टिकवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याची टीका विरोधक करत आहेत. अनेक मतदान केंद्रांवर आधीपासूनच भरलेल्या मतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या, असा विरोधकांचा आरोप आहे. 300 पैकी 221 मतदारसंघांमधील मतदान प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्याचा आरोप बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) प्रवक्त्यांनी केला. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात चितगावमधीलल एका मतदान केंद्रावर मतपत्रिकांनी भरलेल्या पेट्या ठेवल्याचे उघड झाले होते. चितगाव हे बांगलादेशमधील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. या शहरातल्या अनेक मतदान केंद्रांवर केवळ सत्ताधारी पक्षाचेच ’पोलिंग एजंट’ उपस्थित होते.विरोधी पक्षांच्या आघाडीमधील किमान 47 उमेदवारांनी मतदान पूर्ण होण्यापूर्वीच माघार घेतली. बळाचा वापर आणि बनावट मतदान होत असल्याचे पाहून त्यांनी आधीच आपला पराभव मान्य केला. निरीक्षक, कार्यकर्ते आणि सर्व विरोधी पक्ष मतदानाची प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत असतानाच सत्ताधारी मात्र विरोधकांचे आरोप हे खोटे, तथ्यहीन असल्याचे सांगत होते. पुढचे पाच वर्षं बांगलादेशाचे राजकारण कोणत्या मार्गाने जाणार तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर बांगलादेशची भूमिका काय असणार आहे, हे या आता स्पष्ट होईल. मुस्लिमबहुल बांगलादेशसमोर सध्या हवामान बदल, दारिद्र्य, भ्रष्टाचार अशा समस्या आहेत; पण त्यासोबतच म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्‍नही बांगलादेशला भेडसावत आहे. या सर्वच मुद्द्यांवर पहिल्यांदाच सर्व विरोधी पक्ष अवामी लीगविरोधात एकवटले होते; परंतु त्यांची डाळ शिजली नाही. निवडणूक आयोगाने बनावट मतदानाच्या प्रकाराची आम्ही चौकशी करू असे म्हटले होते; मात्र निवडणूक आयोग पक्षपाती असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. शेख हसीना यांच्या पक्षाचा विजय झाला असला, तरी त्यांच्या विजयाला विवादाची किनार आहे.
सत्ताधारी अवामी लीगच्या नेतृत्वाखालील ’ग्रँड अलायन्स’ किंवा महाआघाडी. ही बांगलादेशच्या इतिहासातील सर्वांत जुनी आणि यशस्वी राजकीय आघाडी आहे. गेल्या दहा वर्षांत बांगलादेशच्या आर्थिक आणि मानवी विकासाला चालना मिळाल्याचे श्रेय शेख हसीना यांना दिले जाते.

गेल्या फेब्रुवारीत बांगलादेश नॅशनल पार्टीच्या अध्यक्ष खालिदा झिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर या आघाडीचे अस्तित्व अस्थिर झाले होते. खालिदा यांना शिक्षा झाली असल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नाही. त्यांच्या अनुपस्थितीत माजी परराष्ट्र मंत्री आणि बीएनपीचे सदस्य असलेले कमल हुसैन या विरोधी आघाडीचे नेतृत्व करीत होते. विद्यमान सरकारच्या मानवाधिकार धोरणांवर त्यांनी सातत्याने टीका केली; मात्र आपण निवडणूक लढवणार नसल्याचे हुसैन यांनी म्हटल्याने सेनापतीच रिंगणात नसल्याने सैन्याचा मानसिक पराभव अगोदरच झाला होता. निवडणुकीच्या रिंगणात लेफ्ट डेमोक्रेटिक अलायंस म्हणजेच ’डावी लोकशाहीवादी आघाडी’ ही तिसरी आघाडीही होती. डाव्या विचारसरणीच्या या आघाडीत बांगलादेश कम्युनिस्ट पक्ष, बांगलादेश सोशॅलिस्ट पक्ष आणि क्रांतिकारक कामगार पक्षाचा समावेश आहे. सत्ताधारी अवामी लीग आणि विरोधी बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्ष या दोघांनीही आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिले होते. येत्या पाच वर्षांत देशाचा विकासदर दहा टक्क्यांपर्यंत नेऊ आणि 1.5 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन सत्ताधारी अवामी लीगने दिले होते. ते पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आता शेख हसीन यांच्यापुढे आहे. याशिवाय ’निळी अर्थव्यवस्था’ म्हणजेच ’ब्लू इकॉनॉमी’ नावाने ओळखल्या जाणार्‍या सागरी स्रोतांवर आधारित प्रकल्पांच्या अंमलबजावणीला प्राधान्य देणार असल्याचेही या पक्षाने सांगितले होते. अल्पसंख्याक समाजाचे हीत जपण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग नेमणार, सत्तेत आल्यास भ्रष्टाचाराविरोधात कठोर धोरण आखू अशी आश्‍वासने देण्यात आली होती. बांगलादेशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असून त्याला आटोक्यात आणणे तितकेसे सोपे नाही. हे आव्हान आता शेख हसीना कशा पूर्ण करतात, ते पाहायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शेख हसीना यांच्यात चांगली मैत्री आहे. वर्षानुर्षांचा सीमेचा वाद चिघळत होता. गावांचे आदान-प्रदान करून हा वाद निकाली निघाला असला, तरी अजून तिस्ता नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्‍न सुटलेला नाही. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यात अडथळा आहे. तसेच रोहिंग्याच्या स्थलांतरामुळे भारताची मोठी अडचण झाली आहे. बांगलादेश रोहिंग्याच्या स्थलांतराबाबत कानावर हात ठेवतो आहे. शेख हसीना यांच्यांशी वारंवार बोलून त्यावर तोडगा काढावा लागेल.