Breaking News

दखल : भावना लक्षात घ्या..अपमान नको

महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. केंद्र व राज्य सरकारनं मदतीचा हात द्यावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. त्यात काही वावगं नाही. दुष्काळ जाहीर झाला, की त्यातील तरतुदीनुसारही मदत देता येते. राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचं सरकार आहे. अशा वेळी राज्य सरकारच्या अधिकार्‍यांनी पाठविलेला अहवाल लक्षात घेऊन मदत करायला हवी. प्रत्येक वेळी पाहणीची औपचारिकता तरी कशासाठी? पाहणी झाली, म्हणजे लगेच मदत मिळते असं नाही; परंतु शेतकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन अगोदर जाहीर केलेल्या ठिकाणी पाहणी करायला हवी. 
ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः.
भारतानं तंत्रज्ञानात प्रगती केली आहे. कितीतरी सूक्ष्म बाबींचं चित्रण देशाच्या राजधानीत बसून अधिकार्‍यांना पाहता येणं शक्य आहे. त्यासाठी क्षेत्रीय पाहणी करण्याचं काहीच कारण नाही. पावसाची आकडेवारी, किती दिवसांनी पाऊस पडला, पाण्याची खालावलेली पातळी, पिकांची परिस्थिती आदींची माहिती हवामान विभाग, कृषी विभागाकडून मिळवणं सहजशक्य आहे. उपग्रहाद्वारे पाठविल्या जाणार्‍या छायाचित्रांचाही आधार घेऊन अंदाज लावणं शक्य आहे. दुष्काळ पाहणी दौरा हे पर्यटन करण्यापेक्षा शेतकर्‍यांना मदतीचा हात देणं जास्त महत्त्वाचं आहे. केंद्रीय पथक येणार, ते राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाहणी करणार आणि मग मदतीचे, सवलतीचे निकष जाहीर करणार, या औपचारिकतेत कितीतरी वेळ वाया जातो. लातूरवरून आलेली एक बातमी अतिशय विषण्ण करणारी आहे. चारा नसल्यानं जनावरं खाटकाला विकायची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अजून पाहण्यांची औपचपारिकता करण्यात गुंतले असताना त्यांची मदत येईपर्यंत निम्मी जनावरंही दावणीला राहतात, की नाही, हा प्रश्‍न आहे. एक लाखांची जोडी वीस-पंचवीस हजारांत घ्यायलाही कुणी तयार नाही आणि दुसरीकडं राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे मात्र चारा नसेल, तर जनावरे पाहुण्यांकडं सोडायला सांगतात. शेतीची नाळ तुटली, की नेत्यांचं असं होतं आणि अधिकारी तर केव्हाच शेतीशी नाळ तोडून बसलेले असतात. पाहणीच करायची असेल, तर मग ती गांभीर्यानं करायला हवी. कोरड्या डोळ्यांतील उरलेले अश्रू कसेबसे दाबीत शेतकरी अधिकार्‍यांना जगायचं कसं असं विषण्ण मनानं विचारीत असतील, तर तेवढ्या च गांभीर्यानं त्यांनी शेतकर्‍यांना धीर दिला पाहिजे. लगेच घोषणा करता येत नसली, तरी माणुसकीचा ओलावा तरी दाखविता येतो; परंतु अधिकारी तेवढंही करणार नसतील, तर शेतकर्‍यांचा धीर आणखीच सुटेल. परिस्थितीपुढं हताश होऊन शेतकर्‍यांनी अगोदरच काळोखाचा मार्ग धरला आहे. बीडमध्ये तर दुष्काळी पथक दौर्‍यावर असताना शेतकर्‍यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकानं पेडगावमध्ये (ता. परभणी) पाहणी करण्याचं नियोजन केलं; मात्र ऐनवेळी पाहणी होऊ शकली नाही. त्यामुळं केंद्राच्या या पथकास शेतकर्‍यांच्या तीव्र रोषास सामोरं जावं लागले. पेडगावसोडून पुढं निघालेल्या पथकास गावातील शेतकर्‍यांनी 150 मोटारसायकलींद्वारे मानवत रोड येथील रेल्वे गेटवर गाठलं. शेतकर्‍यांच्या संतप्त भावना पाहून अखेर या परत निघालेल्या पथकाला पेडगावात पाहणीसाठी यावं लागलं. जिल्ह्यातील परभणी, सेलू व मानवत या तीन तालुक्यांतील अनुक्रमे पेडगाव, गणेशपूर व रूढी या एका रस्त्यावरील तीन गावांत पाहणी करण्याच्या दृष्टीनं भेटी देण्यासाठी केंद्रीय पथक बुलडाण्याहून गणेशपूर इथं दाखल झालं. 10 मिनिटांच्या पाहणीचे सोपस्कार आटोपून हे पथक रूढीकडं जाण्यास निघालं. त्यामुळं पेडगावच्या ग्रामस्थांना आपलं गाव पाहणीतून वगळलं जात आहे, हे समजताच ते संतप्त झाले. 100 ते 150 मोटारसायकलींद्वारे पेडगावमधील शेतकरी रूढी या गावाकडं निघाले. हे शेतकरी मानवत रोड येथे आले असता सचखंड एक्स्प्रेस औरंगाबादकडे रवाना होत असल्यामुळं रेल्वे गेट बंद होतं. सेलू मार्गे रूढीकडे निघालेला केंद्रीय अधिकार्‍यांचा ताफा याच गेटवर दाखल झाला. ही संधी साधून संतप्त शेतकर्‍यांनी केंद्राचे नीती आयोगाचे सल्लागार मानस चौधरी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर व जिल्हाधिकारी पी.शिवशंकर असलेल्या गाडीला घेराव घातला. शेतकर्‍यांनी ताफ्यातील वाहनांसमोरच झोपण्याचा इशारा देत संतप्त भावना व्यक्त करीत पथकाला पेडगावला येण्यास भाग पाडले आणि गाड्या रेल्वे गेटहून माघारी पेडगावकडे रवाना झाल्या. पेडगावमध्ये गणेश हरकळ व उत्तमराव वरकड यांच्या शेतातील पिकांची पाहणी या पथकानं केली. मुळात एका गावाला भेट दिली काय आणि पाच गावांना भेट दिली काय; चित्र सर्वत्र सारखंच असणार आहे. त्यानं काहीच फरक पडत नाही; परंतु अगोदर जाहीर होऊनही पथक न आल्यामुळं गावकरी संतप्त होणं स्वाभावीक आहे. एखाद्या गावाला भेट दिली नाही, म्हणजे त्या गावाला मदत मिळणार नाही, असं नाही. मात्र, त्यासाठीची मानसिकता शेतकर्‍यांची करण्यात अधिकार्‍यांना यश आलेलं नाही. 
पेडगावला जे झालं, ते नगर जिल्ह्यातील पाथर्डीला ही झालं. अधिकार्‍यांनी जाहीर करूनही पथक न आल्यानं शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. पाहणी दौरा ठरविताना जिल्हास्तरीय अधिकारी आणि केंद्रीय पथकात समन्वय नसतो का, असा प्रश्‍न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. शेतकर्‍यांचा अपमान करू नका, त्यांच्या भावना लक्षात घ्या, असं सांगण्याची वेळ आली आहे. दुष्काळी पाहणी दौरा दिवसा केला, तरच त्यातलं गांभीर्य लक्षात येतं. अर्थात काही भाग दिवसा पाहिला आणि काही भाग रात्री पाहिला, तरी परिस्थिती बदलणारी नसते; परंतु अगोदर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी रात्री दुष्काळी दौरे केले. मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात परिस्थिती पाहिली! आता केंद्रीय पथक असंच करणार असेल, तर खरंच मदत मिळणार का, असा प्रश्‍न शेतकर्‍यांच्या मनात निर्माण होतो. त्यातून शेतकर्‍यांची नाराजी होते. दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आलेलं केंद्राचं पथक गुरूवारी संध्याकाळी सहा वाजता पुरंदर तालुक्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी पोहोचलं. पथकाला पोहोचायला उशीर झाल्यानं अंधार पडला होता. त्याच अंधारात पथकातल्या सदस्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. शेतकर्‍यांच्या नशिबात कायम अंधारच असतो. किमान मदत पथकानं तरी उजेडात यायचं होतं ,अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यातील पाहणीनंतर हे पथक पुरंदरला आलं. यात केंद्रीय अर्थ विभागाचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, खाद्यान्न विभागाचे उप महाव्यवस्थापक एम. जी. टेंबुरणे तसेच पशुसंवर्धन विभागाचे विजय ठाकरे, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींसह मोठा ताफा पुरंदर तालुक्यातील मावडी सुपे आणि राजुरी येथील दुष्काळाची पाहणी करणार होते. मावडी सुपे इथं पोहोचतानाच अंधार झाल्यानं पथकाला पाहणी करता आली नाही; मात्र पथकातील सदस्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. स्थानिक शेतकर्‍यांनी दुष्काळाबाबत आपली गार्‍हाणी पथकासमोर मांडली.


पथकानं खरी परिस्थिती काय आहे हे प्रत्यक्ष पाहिलं. शेवटच्या ठिकाणी भेट देताना अंधार झाला, तरी काळजीचं कारण नाही. कारण पथकानं दिवसभर पाहणी केल्यामुळं नेमकी काय परिस्थिती आहे, याची याची जाणीव त्यांना आहे. सरकार जास्तीत जास्त मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केलं असलं, तरी त्यातून शेतकर्‍यांचं समाधान झालं नाही. शेतकर्‍यांच्या बाबतीत अधिकार्‍यांनी संवेदनशील असायला हवं.