Breaking News

मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या अ‍ॅड. सदावर्ते यांच्यावह हल्ला


मुंबई (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होती. सुनावणीनंतर अ‍ॅड. सदावर्ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधत होते. त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.वैजनाथ पाटील असे हल्लेखोराचे नाव असून तो मूळचा जालना येथील राहणारा आहे.

हल्लेखोराने ’एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा करत अ‍ॅड. सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु अ‍ॅड. सदावर्ते यांच्या इतर सहकार्‍यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवरील सुनावणीच्या कामाकाजाबद्दल अ‍ॅड. सदावर्ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देत होते. या दरम्यान, एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देत, हल्लेखोर वैद्यनाथने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सदावर्तेंच्या चेहर्‍यावर एक बुक्का बसल्याने त्यांचा चष्मा खाली पडला. अ‍ॅड. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका का केली, असा सवाल करत त्याने शिवीगाळही केली. नंतर सदावर्ते यांच्या इतर सहकार्‍यांनी त्याला पकडून चांगला चोप दिला. नंतर उच्च न्यायालय परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

आरक्षणाविरोधात याचिका केल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे अ‍ॅड. सदावर्ते यांनी सांगितले. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदविल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील यांनाही ही बाब सांगिल्याचे अ‍ॅड. सदावर्ते यांनी सांगितले.